२२. चार्मर
राघवन पक्का आणि अस्सल चार्मर आहे. पुंगीवाला सापाला डोलवतो ना तसं लोकांना आपल्याभोवती डोलवणारा. आसपासच्या माणसांचं मर्म जाणणारा, दर्द ओळखणारा, आवडीनिवडी माहीत असणारा, त्यांचे मूड जाणणारा, अन् त्यानुसार आपली चाल खेळणारा. हुशार अन् चलाख- चपळ असा चार्मर राघवन्.
राघवन कधीच तंटा घेत नाही. राघवनची कधी तक्रार नसते की राघवन कधी कुणाला उलट बोलत नाही की कुठला चकार शब्द काढत नाही. वाद टाळतोच तो. कारण वादावादीच्या तुफान वातावरणात तो त्याची मंद भुरळ अन् गुंग प्रभाव टाकूच शकत नाही.
चार्मरची ताकद, त्याची वाणी अन् कुठल्याही बिकट परिस्थितीत तुमच्यावर गर्द मोहिनी टाकण्याची अजोड क्षमता. राघवन नेमका तसा आहे चार्मर. त्याला बाकी काही करता येत नाही. ना ड्राफ्टिंग येत की मार्केटिंगच्या युक्त्या माहीत. तो ना हार्डवर्कर, तो ना कामाला वाघ पण तरीही कपूरसाहेबांच्या केबिनमध्ये, जिथं सारं ठरतं तिथं म्हणजे तिथंच त्याचा राबता असतो. सत्तेच्या जवळ राघवन एक अस्सल वस्ताद भुलैया. आसपास बघा बरं तुमच्या आहे का एखादा चार्मर?
३३ कार्यशैली