पान:कार्यशैली.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३. चेह-यावर काय दिसतंय?



 काही दिवसांपूर्वी एका जाहीर मुलाखतीत एका मोठ्या कर्तबगार माणसाला एक खासगी पण छान प्रश्न विचारला. त्याला विचारलं, "तुम्ही तुमच्या बायकोची निवड कशी काय केली? तो प्रश्न विचारल्याबरोबर आम्ही सर्वांनीच कान सरसावले.
 तो मोठा माणूस उद्गारला, "जी माझ्याबरोबर कुठल्याही गावात यायला तयार आहे. कुठलेही कष्ट सोसायची तयारी आहे आणि कितीही उशिरा मी घरी आलो तरी हसतमुखानं सामोरी येऊन उत्तम चहाचा कप समोर ठेवण्याची तिची तयारी आहे, तिच्याशीच मी लग्न करेन असं मी ठरवलं होतं.
 टाळ्या पडल्या. यावर काहींना धन्यही वाटलं. काहींना त्याच्या थोरवीची आणि कर्तबगारीची कमाल वाटली. काही हसले तर काहींना त्यांच्या यशाचं गमक सापडलं असं मला दिसत होतं.

 मला त्या माणसाच्या बायकोचा चेहरा पाहायचा होता. आपला नवरा आपल्याला ओढत नेईल, तिकडे जाणान्या त्या बाईनं जे काही सोसलं असेल त्याचं दर्शन तिच्या चेह-यावर दिसतंय का ते मला पाहायचं होतं. तिथं खिन्नता आहे की समाधान. तिथं आनंद आहे की वैषम्य की तिथं काहीच नाही हे मला शोधायचं होतं.

कार्यशैली।३४