पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि आपली संस्कृतीच अखेर महाराष्ट्राच्या समाजजीवनातले आपले स्थान निश्चित करणार आहे, याची त्याला पुरती जाणीव झालेली नाही. इथल्या जीवनात रुळलेली मराठी समजल्याशिवाय गत्यंतर तर नाही आणि उर्दूविषयी अकारण निर्माण झालेल्या जिव्हाळ्याने तिला बिलगण्याचा मोह तर आवरत नाही, अशी बहुसंख्य मुसलमानांची त्रिशंकू अवस्था झालेली आहे.
 आमच्यातला व महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातला हा अलगपणा स्वातंत्र्यानंतर नष्ट व्हावा आणि निदान भाषिकदृष्ट्या तरी मुसलमान इथल्या जीवनात मिसळून जावा, असे प्रयत्न पुन्हा करण्यात आले. परंतु मुस्लिम बहुजन समाजांत अनेक वर्षांच्या शिकवणुकीमुळे मराठी भाषा आणि संस्कृती यांविषयी एक प्रकारचा परकेपणा निर्माण झालेला असल्यामुळे या बदलास साहजिकच विरोध झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या परिस्थितीची इथे सविस्तर माहिती देणे अप्रस्तुत ठरणार नाही.
 रत्नागिरी जिल्हा स्कूल बोर्डाने स्वातंत्र्यानंतर बदललेल्या काळास अनुसरून मुसलमान विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांतून शिक्षण देण्याचा एक ठराव मंजूर केला. परंतु स्कूल बोर्डातल्या मुसलमान सभासदांनी याला कडाडून विरोध केला. रत्नागिरी शहरात याच सुमारास एक उर्दू विकास मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्यामार्फत स्कूल बोर्डाच्या प्रस्तावाचा निषेध तेव्हाचे शिक्षणमंत्री श्री. बाळासाहेब खेर यांच्याकडे करण्यात आला. स्कूल बोर्डाचे शैक्षणिक अधिकार कमी करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार, सरकारने प्राथमिक शिक्षणाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्कूल बोर्डाचा ठराव तसाच खुंटीला टांगला गेला.
  स्कूल बोर्डाच्या या ठरावाच्या अनुषंगाने श्री. अप्पासाहेब पटवर्धन यांनाही मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एक योजना सुचविली होती. मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे माध्यम मराठी असावे आणि एक जादा भाषा म्हणून त्यांना उर्दू देण्यात यावी, असे त्या योजनेचे (स्कूल बोर्डाचा ठरावदेखील असाच होता.) स्वरूप होते. सरकारचे धोरणदेखील अप्पासाहेबांच्या योजनेप्रमाणे असेल असे, (मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यम मराठी असावे असे प्रयत्न करणाऱ्या) आमच्यासारख्यांना वाटत होते.

 परंतु, मुंबई सरकारने आपले पूर्वीचे वेगळेपणाचे धोरण चालू ठेवले; इतकेच नव्हे, तर त्यात अधिक भर घालण्यात आली! पूर्वी मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुसलमान मुलाला एक जादा भाषा म्हणून उर्दूची सोय केलेली होती. आता ती बंद करण्यात येऊन उर्द माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलाला मात्र एक भाषा म्हणून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्यात आली. याचा परिणाम असा झाला की, उर्दूशी असलेला आपला संपर्क तुटेल, या भीतीने मराठी माध्यमांतून आपल्या

६ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा