पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रीय
 मुसलमान


 महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख फेब्रुवारीच्या 'किर्लोस्कर'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि परिपूर्ण नाही. 'आम्ही येथेच जन्मलो, येथेच वाढलो, इथली भाषा ही आमची भाषा आणि हा देश हा आमचा देश'- हा युक्तिवाद (तो कितीही बरोबर असला तरी) स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा करण्यात आला आणि विफल ठरला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रीय मुसलमानांत मराठी भाषा आणि संस्कृती यांविषयी जो एक परकेपणा आलेला आहे, तो केवळ प्राचीन परंपरेने आलेला नाही. भाषिक आणि सांस्कृतिक अलगपणा जो आलेला आहे तो राजकीय अलगपणाच्या, फुटीरपणाच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेला आहे. राजकारणाचा भाग सोडला, तर आज भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मुसलमान एक प्रकारच्या अलगपणाच्या भूमिकेत वावरत आहेत. हा अलिप्तपणा नष्ट व्हावा असे वाटत असेल, तर आम्हा मुसलमानांच्या शैक्षणिक भूमिकेचा आधी विचार केला पाहिजे.

 स्वातंत्र्याच्या काळापर्यंत आमच्या मुसलमान विद्यार्थ्यांना वेगळ्या उर्दू शिक्षणाची तरतूद करण्यात आली. इथल्या बहुजन समाजाशी असले-नसलेले सांस्कृतिक संबंध तोडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करण्यात आला. उर्दू भाषेची वेगळी परंपरा निर्माण करण्यात आली. परंतु इथले संबंध आम्ही पूर्णपणे तोडू शकलो नाही, की मराठीशी फारकत करून घेऊन उर्दू पचवू शकलो नाही. आज तर मुस्लिम समाज या प्रश्नाकडे गोंधळलेल्या दृष्टीने पाहत आहे. आपली भाषा

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ५