पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "हां, हां. लेकिन महंगाई भी बढ़ी है. लोग उसीसेही तंग आये हुये महसूस हुये!" मदिनेवाले म्हणाले. बहुधा काफिरांच्या चेहऱ्यावर तेज नसल्याच्या सिद्धान्तावर (मदिन्याला राहूनही) त्यांचा विश्वास नसावा!
 ते निघून गेले. मंडळी पांगली. कोणी तरी एक मुलगा आला. पहिले मौलाना माझ्याशेजारीच बसून राहिले होते. ते म्हणाले, “जरा आपण बाहेर फेरफटका मारून येऊ या."
 त्यांनी संबंध मदरसा दाखविला. वर्ग चालू होता. एका वर्गात एक मौलाना हदीस शिकवीत होते. बाहेर उभे राहून थोडा वेळ त्यांचे प्रवचन ऐकले. काही विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांच्याशी इच्छा असूनही चर्चा करता आली नाही. ते वर्गात जायच्या घाईत होते. जे घाईत नव्हते, ते बोलू इच्छित नव्हते. त्यांच्या शिक्षकांच्या समोर आपली मते मांडायला त्यांना अवघडल्यासारखे वाटत होते काय, काही कळले नाही.
 रस्त्यात पुस्तकांचे दुकान होते. त्यात मो. हुसेन अहमद मदनींच्या आत्मचरित्राचे दोन्ही खंड उपलब्ध होते. मी ते विकत घेतले. परतताना तो मुलगा म्हणाला, “हमीदसाहेब, नुकताच रांचीला दंगा झाला. मुसलमानांवरला हा जुलूम कधी थांबेल? तुमचे मत काय आहे?"
 मी काहीच बोललो नाही, तोच पुढे म्हणाला, “आमचे काय आहे, ते आम्हाला देऊन का टाकत नाहीत?"
 पहिले मौलाना म्हणाले, “यह गलत बात है. आता पुन्हा देण्या-घेण्याची भाषा बरोबर नाही!"
 ते अधिक काही बोलले नाहीत. परंतु एवढ्या समंजसपणाची भाषा फक्त त्यांच्या तोंडून सकाळपासून पहिल्यांदाच मी ऐकत होतो.
 मी त्या मुलाला विचारले, “तू काय करतोस?"
 "नोकरी."
 “पढाई किती झाली आहे?"
 “फारशी नाही. उर्दतून लिहिता-वाचता येते."
 "हे ‘आमचे', ते तुमचे' तुला कुणी शिकवले? मुसलमानांना वेगळे द्यायचे म्हणजे काय? त्यांना एकदा पाकिस्तान दिले गेले, हे तुला माहीत आहे का?"
 “जाऊ द्या हो, तो बच्चा आहे! मोठी माणसे काही तरी बोलतात, ते मुले ऐकतात आणि विचार न करता तेच बडबडू लागतात!"
 मौलवीसाहेबांचे म्हणणे खरे होते. पण याचा अर्थ, कुठे तरी असे बोलले जात आहे, असा होतो. कुठे? मशिदीतून, मोहरमच्या वाज (प्रवचन) मधून


कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ५५