पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



खुतबा (सामुदायिक नमाजेनंतर देण्यात येणारे प्रवचन) पढताना? राजकीय आणि धार्मिक पुढाऱ्यांच्या खासगी बोलण्यातून? त्या मुलाच्या बोलण्यातून जो विचार ध्वनित होत होता, त्याच्या परिणामाच्या कल्पनेने मी शहारलो.
 अखेरीला मौ. तय्यबना भेटलो. ही भेट बरीच औपचारिक, नेहमीच्या सोपस्कारांनी परिपूर्ण ठरली. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर. फरशीवर सतरंज्या आणि मऊ-मऊ गाद्या. मधोमध तक्क्याला टेकून तय्यबसाहेब बसलेले. जरा भांबावलेल्या मन:स्थितीतच आत प्रवेश केला. त्यांना आदाब अर्ज करून समोर बसलो. आजूबाजूला बरेचसे मौलाना बसलेले. त्यात आधी जेवण करताना उपस्थित असलेलेही काही होते. मदिनेवाले मौलानाही तय्यबसाहेबांच्या दर्शनाला आले होते.
 माझ्या आदाब अर्जचा स्वीकार करून तय्यबसाहेबांनी कुणाला तरी खूण केली, तसा चहा आला. अतिशय छोटे रंगीबेरंगी ग्लास. त्यात कोरा चहा. याला काश्मिरी चहा म्हणतात. येथे 'कावा' या नावाने तो ओळखला जातो. 'बिस्मिल्ला हिर्राम निर्रहीमा'चा गजर झाला आणि सर्वांनी ते ग्लास तोंडाला लावले.
 “वाहवा! क्या लजीज चीज है!" मदिनावाले रिकामा ग्लास खाली ठेवून उद्गारले आणि मग ती शांतता भंग पावली. मी तय्यबसाहेबांकडे पाहिले. त्यांचा चहा संपला होता. त्यांचे पाणीदार डोळे माझ्यावरच रोखले गेले होते. दाढी अर्धवट पिकलेली. खास काळी टोपी. पाय अदबशीरपणे दुमडलेले. समोर कसले तरी पुस्तक.
 माझ्या मनात त्यांच्याविषयी आधीच अढी निर्माण झाली होती. कारण नेहरूंच्या मृत्यूनंतर काही मुसलमानांनी मशिदीत नमाज अदा केली आणि त्यांना जन्नत नसीब होवो' अशी दुवा म्हटली. यावर काही मुस्लिम मंडळींनी मौ. तय्यब यांच्याकडे फतवा मागितला. प्रश्न असा- बिगरमुसलमानाच्या मृत्यूनंतर मुसलमान त्याला जन्नत लाभावी म्हणून प्रार्थना म्हणू शकतो काय?
 'नाही' असे मौलाना तय्यब यांनी आपल्या फतव्यात उत्तर दिले आहे. हे उत्तर तसे मासलेवाईक आहे. त्यांनी फतव्यात पुढे म्हटले आहे : ज्यांना नेहरू जन्नतीत जावे असे वाटत होते, त्यांनी त्यांना (नेहरूंना) त्यांच्या हयातीत मुसलमान केले असते तर इस्लामची फार मोठी सेवा त्यांच्या हातून घडली असती. बिगरमुस्लिमासाठी अशी प्रार्थना म्हणणे हाच इस्लामद्रोह आहे. ज्यांनी प्रार्थना म्हटली, त्यांनी आपण मुसलमान असल्याची जाणीव ठेवली नाही. लानत हो ऐसे लोगोंपर खुदाकी!
 मौ. तय्यबनी विचारले, “काय काय पाहिलेत? कोणती माहिती हवी आहे आपल्याला आमच्याकडून?"


५६ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा