पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानांवर पुस्तक लिहू इच्छितात. देवबंद मदरशाची माहिती गोळा करायला इथे आले आहेत."
 “वाहवा! चांगले नेकीचे काम करीत आहात!" मदिनावाले उद्गारले. परंतु माझ्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे मात्र त्यांनी टाळले.
 खिशातून त्यांनी शंभर रुपयांची नोट काढली आणि पैशांचा व्यवहार पाहत असलेल्या मौलानांकडे मदरशाकरता दिले. त्याची पावती करून दिली. दरम्यान, कोणीच काही बोलेना. माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या संभाषणाचा रंग विस्कटला की काय, असे मला वाटू लागले. मी काहीसा अवघडून बसलो.
 हिशेब सांभाळणारे मौलाना बोलू लागले, “असे तुमच्यासारखे दाते आहेत, म्हणून हा मदरसा चांगला आहे. परंतु पंधराशे विद्यार्थी. त्यांच्याकडून आम्ही एक पैसादेखील घेत नाही. जगातील सर्व देशांतील मुसलमान आम्हाला पैसे पाठवतात."
 "चालवायला तो समर्थ आहे!" मदिनेवाल्यांनी आकाशाकडे बोट दाखवले. त्यांना स्वत:कडे श्रेय घ्यायचे नव्हते. आणि मग झटकन ते माझ्याकडे वळून म्हणाले, “हमीदसाब, अरबस्तानचे कायदेकानू वेगळे आहेत. म्हणून तिथे चोऱ्या होत नाहीत. तिथे इस्लामचे कायदेकानून अस्तित्वात आहेत."
 "मला माहीत आहे." मी शक्य तितक्या नम्रपणे म्हणालो.
"आणि आपले भारतीय मुसलमान तिथे काझी आहेत. ते न्याय देतात. तेच अरबांना मजहब शिकवतात."
 “वाहवा! सुभानअल्ला! अरबांच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना इस्लाम शिकवला; आता आम्ही आमच्या इस्लाम शिकवणाऱ्यांच्या वारसदारांना तो शिकवत आहोत. त्यांचे ऋण फेडीत आहोत. वाहवा!" हिशेब ठेवणाऱ्या त्या मौलानांनी भावनावेगाने डोळे मिटून घेतले!
 “कुठे कुठे फिरलात?" पेशावरी मौलानांनी मदिनेवाल्यांना विचारले.
 "सगळ्या ठिकाणी जातो आहे. मदरसे, मशिदी पाहतो आहे. जेवढे होईल तेवढे दान करतो आहे."
 "दिल्लीला गेला होता?"
 "होय, जुन्या दिल्लीतही फिरलो. पण का कुणास ठाऊक, मला लोक निरुत्साही, मरगळलेले दिसले. कुणाच्या चेहऱ्यावर टवटवी म्हणून दिसली नाही."
 “अरे भाईसाब, पहले चांदनी चौक वगैरा मोहल्लोमें मुसलमान रहा करते थे. अब वह वहाँ नहीं दिखाई देते. मुसलमान के चेहरेपे जो तजल्ली दिखाई देती है वो भला काफरके चेहरे पर कहाँ दिखाई देगी?" हिशेब पाहणारे मौलाना म्हणाले.


५४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा