पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एका छोट्या प्लेटमध्ये मटणाचे कालवण आणले व माझ्या पुढ्यात ठेवले. मी म्हणालो, “मला हे वेगळे कशाकरता? आपल्याबरोबर मीही खाईन की.”
 "तुम्हाला ते पचणार नाही." मौ. मदनी मला म्हणाले. “हे म्हशीचे मटण आहे. तुम्हाला खायची सवय नाही, म्हणून तुमच्याकरता बकऱ्याचे मटण आणले आहे."  "इथे म्हशीचे मटण कसे काय मिळते?"
 “गाईचे मिळत नाही म्हणून!" मदनीसाहेब शांतपणे म्हणाले, “गोहत्येला बंदी आहे. बकऱ्याचे मांस परवडत नाही. या मदरशात एकूण पंधराशे विद्यार्थी आहेत. एवढ्यांना बकऱ्याचे मटण कुठून आणायचे? म्हणून आम्ही म्हशीचे मटण आणतो. ठीक आहे. तुम्ही जेवायला लागा. सकाळपासून काही खाल्ले नसेल."
 “बिस्मिल्ला हिरीमा निर्रहिम' असे म्हणून त्यांनी हातात रुमाल घेतला आणि त्यातील पोळ्या ते प्रत्येकाला वाटू लागले. प्रथम मला दिल्या. आम्ही जेवू लागलो.
 मौ. मदनीदेखील जेवतच होते. परंतु जेवता-जेवता ते प्रत्येकाच्या हातातली पोळी संपली की चटकन रुमालातील देत होते. तेवढ्यात तिथे एक गृहस्थ आले. त्यांची आधीची ओळख होती. 'अस्सलामुअलयकुम'ची फैर झडली. जेवायला बसलेल्या प्रत्येकानं 'अस्सलामुअलयकुम' म्हटले आणि प्रत्येकाला आदबशीरपणे वाकून त्या गृहस्थांनी ‘वालेकुम सलाम'चा प्रतिजवाब दिला.
 “जेवायला या, जेवायला या-" जवळजवळ साऱ्यांनीच त्यांना आग्रह केला.
 “जेवण झाले आहे. तुमचे चालू द्या. काही कामानिमित्त आलो होतो. म्हटले, मदनीसाहेबांच्या घराला भेट देऊन जावे."
 "बरे केले आलात. तुम्ही आग्र्याला असता, नाही का?" मदनीसाहेबांनी विचारले. स्वत: जेवणे, इतर जेवणाऱ्यांच्या हातातील पोळी संपताच झटकन त्यांना हातातल्या रुमालातील पोळी देणे आणि आलेल्या त्या गृहस्थांबरोबर संभाषण करणे, या तिन्ही क्रिया ते एकाच वेळी बिनचूक पार पाडत होते.
 ते गृहस्थ मदनीसाहेबांना काही वेळ निरखीत राहिले. मग एकदम म्हणाले, "मरहुम हुसेन अहमद मदनीसाहेबांच्या वेळेपासून मी येथे येत आहे. ते असेच सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. अशीच परात, अशाच पोळ्या आपल्या हाताने प्रत्येकाला द्यायचे. तसेच चालले आहे. तुम्ही वडिलांची ही परंपरा तशीच चालवली आहे."
 मौ. मदनीसाहेबांचा चेहरा लकाकला. तोंडाशी आलेला घास तसाच थांबवून ते म्हणाले, “होय. आणि असेच चालणार. इन्शाअल्ला, आम्ही या परंपरा अशाच जतन करून ठेवणार!"

५२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा