पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जेवण संपले. बरीचशी मंडळी पांगली. मग मी, पहिले मौलानासाहेब, तिथे हिशेबाचे कामकाज पाहणारे एक मौलाना आणि दुसरे एक पेशावरी मौलाना असे उरलो. बोलण्यासारखे काही नव्हतेच. मी तसाच बसून राहिलो. तेवढ्यात आणखी एक गृहस्थ आले.
 पुन्हा 'सलामअलयकुम'ची फैर झडली. त्या गृहस्थांनी देवबंदी टोपी घातली होती. थोडी पूर्वीची ओळख असावी, असे दिसले. पैशांचा व्यवहार पाहणारे मौलाना सावरून बसले. “आईये, आईये"चा त्या साऱ्यांनीच गदारोळ केला. मग बोलणे सुरू झाले.
 "कधी आलात?"
 "चार महिने झाले."
 “कुठे असता?"
 “मदिना मुनव्वरा."
 मदिन्याचे नाव कानावर पडताच सारेच जण “वाहवा, वाहवा" म्हणाले. त्यांचे चेहरे सांगू लागले, 'तुम्ही किती भाग्यवान! मदिन्याला असता! आम्हाला तर त्या पवित्र शहराचे दर्शन केवळ कल्पनेनेच घेता येते!'
 “आता किती वर्षे झाली?"
 “बटवारा झाला आणि लगेच गेलो. मी लुधियानाचा. दंगल झाली. मुसलमानांची पंजाबमध्ये नावनिशाणीही राहिली नाही. मी दिल्लीला आलो. सर्वस्व गेले होते. काही दिवस कसे तरी चार नातेवाइकांकडे काढले. तेवढ्यात अरबस्तानात मौलवी हवे असल्याचे कळले. मी गेलो. काही दिवस एक मदरसा चालवला. मग हिऱ्यांच्या विक्रीचे दुकान काढले. आता मौलवीगिरी करत नाही. तिजारतच करतो."
  “तिथे दुकाने उघडी टाकून फिरता येते, इथल्यासारखे नाही; खरे ना?" पेशावरी मौलानांनी विचारले.
  "अगदी खरे. अगदी रस्त्यावर फेरीवाला आपल्या मालावर रुमाल टाकून नमाजेला जाऊन येतो. कोणी त्याच्या मालातील पिनदेखील उचलणार नाही."
 मधेच संभाषणात मी स्वत:ला झोकून दिले. म्हणालो, "तसे म्हणायचे तर तेथील हिऱ्याचे दुकान तसेच उघडे टाकून तुम्ही इथला प्रवास आटोपून जायला हरकत नाही. असेच ना?"
 त्या साऱ्यांनी चपापून माझ्याकडे पाहिले. मग मदिनावाल्यांनी विचारले, "हे कोण ? इन्का तआरुफ नहीं करवाया आपने."
 “यांचे नाव दलवाई. हमीदसाहेब दलवाई. मुंबईहून आले आहेत.

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ५३