पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  मी माझा मुद्दा स्पष्ट केला. म्हणालो, "कुराणात बदल करण्याचा प्रश्न नाही. मी कुराणाच्या अभ्यासक्रमाविषयी बोलतो आहे. कुराण शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल होऊ शकतो की नाही? उदाहरणार्थ, इतिहास तोच असला तरी इतिहासाची नवनवी पुस्तके निघत असतात. नव्या पद्धतीने, नव्या दृष्टीने इतिहास शिकवण्यावर सध्या भर दिला जातो. कुराण, हदीस यांच्या अभ्यासक्रमाबाबत असे काही होत आहे का?"
 त्यांनी विचारले, “कुराण आणि इतिहास एकच आहे का?"
 मी हतबुद्ध झालो आणि अधिक प्रश्न विचारण्याचा नाद सोडून दिला.
 मदनीसाहेब थोड्या वेळाने निघून गेले आणि पहिले मौलाना पुन्हा प्रकटले. कानाशी लागून बोलतात तसे, खालच्या आवाजात म्हणाले, "तुमची दुपारी मौ. तय्यबसाहेबांशी भेट होईल. त्यांची वेळ नक्की केली आहे." आणि मग ते तय्यबसाहेबांबद्दल तक्रारी करू लागले. “मौ. हुसेन अहमद मदनी 'रहिमतुल्ला हे अलय' यांनी येथे निर्माण केलेले सगळे नष्ट करण्याचा तय्यबसाहेबांनी चंग बांधला आहे. त्यांनी निर्माण केलेली परंपरा, त्यांचे विचार- सर्व काही नाहीसे केले जात आहे. आता हेच पाहा ना. मौ. मदनी 'रहिमतुल्ला हे अलय' यांनी या घराच्या अंगणात एक आंब्याचे झाड लावले होते, तय्यबसाहेबांनी ते गाडून टाकले!"
 ते गृहस्थ मला हे सगळे का सांगत आहेत, हे कळेना. मौ. मदनींच्या नावामागे 'रहिमतुल्ला हे अलय'ची उपाधी उच्चारण्याची त्यांची लकब मला मजेदार वाटली. साधारणत: मृत अवलिया-संतपुरुष यांच्या नावाचा उच्चार 'रहिमतुल्ला हे अलय'ने(याचा अर्थ 'परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी होवो') होत असतो. परंतु मागाहून माझ्या लक्षात आले की, कोणत्याही मृत मौलानाच्या नावानंतर 'रहिमतुल्ला हे अलय'चा उच्चार ते करीत होते. मौ. शब्बीर अहमद उस्मानींचा (मौ. उस्मानी १९४० मध्ये जमायतुल-उलेमा या संघटनेतून फुटून निघाले व पाकिस्तानचे पुरस्कर्ते बनले.) मी उल्लेख केला, तेव्हा माझ्याऐवजी त्यांनीच 'रहिमतुल्ला हे अलय'चा गजर केला. त्यानंतर कोणत्याही फालतू मृत मौलानाच्या नावाचा उच्चार 'रहिमतुल्ला हे अलय'खेरीज होत नाही, हे माझ्या लक्षात आले. देवबंदचे हे सगळेच मौलाना मृत्यूनंतर पीर-अवलिया बनतात, हे पाहून गंमत वाटली!
 दुपार झाली आणि एकदाचे जेवण आले. जेवण येताच अनेक मौलाना, कुठून कुणास ठाऊक, उपस्थित झाले. जेवण म्हणजे एका मोठ्या परातीत मटणाचे कालवण आणि एका मोठ्या रुमालात बांधलेल्या गव्हाच्या पोळ्या. सर्व जण त्या परातीभोवती वर्तुळाकार बसले. मीही बसलो. तेवढ्यात मौ. मदनी आले. त्यांनी माझ्याशी एव्हाना बोलत असलेल्या मौलानांना इशारा केला. त्यांनी

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ५१