पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देवबंद
२५ ऑगस्ट १९६७
 मीरतहून देवबंदला आलो. देवबंद अगदीच किरकोळ स्टेशन. पॅसेंजर गाडी खडखड करीत येऊन उभी राहिली. मी उतरून स्टेशनच्या बाहेर पडलो. एका सायकलरिक्षावाल्याने विचारले, "बाबूजी, कहाँ जाना है? मदरेसे मे?"- याला कसे कळले? मदरशात बहुधा खूप लोक येत असावेत.
 कडव्या धर्मपंथी मौलानांनी 'देवबंद' हा गाव इस्लाम धर्माच्या प्रचारकार्यासाठी निवडावा, हा एक विनोद. रिक्षातून जाताना देवबंदी टोप्या घातलेली आणि दाढ्या वाढवलेली बरीच तरुण मुले दिसली. हरिद्वारला जसा साधूंचा सुळसुळाट, तसा इथे या दाढीवाल्यांचा सुळसुळाट दिसला. एक मशीद रस्त्याला लागली. नंतर रिक्षावाला थांबला.
 थोड्याशाच चौकशीनंतर पैगंबरवासी मौलाना हुसेन अहमद मदनी यांच्या घरी गेलो. दिल्लीला मला असद मदनींनी (पै. मौ. हुसेन अहमद मदनी यांचे चिरंजीव. जमायतुल उलेमाचे तेव्हाचे चिटणीस व राज्यसभेचे काँग्रेस पक्षीय सभासद.) पत्र दिले होते. मी गेलो तेव्हा तिथे कुणी मौलानाच होते. त्यांना पहिले मौलाना' म्हटले पाहिजे. कारण दिवसभर ते वारंवार भेटले. त्यांनी मला त्या विस्तीर्ण लांबच लांब पसरलेल्या खोलीत नेले. तिथे जमिनीवर सतरंजी पसरली होती. तिच्यावर माझी बॅग मी ठेवली आणि तिथेच बसलो.
 थोड्या वेळाने तिथे दुसरे एक मौलाना आले. ते बरेचसे तरुण दिसत होते. पहिल्या मौलानांनी त्यांची ओळख करून दिली. त्यावरून ते असद मदनींचे बंधू असल्याचे कळले. त्यांनी आस्थेने चौकशी केली. “काही संकोच बाळगू नका. घर तुमचेच आहे असे समजा." ते म्हणाले. मग “कशाकरता आला आहात?" अशी चौकशी केली.
  मी थोडक्यात त्यांना कल्पना दिली. मग म्हणालो, “मला दरसे निझामियाची (मुस्लिम धर्मपीठातील अभ्यासक्रमाला 'दरसे निझामिया' म्हणतात. औरंगजेबाच्या आज्ञेवरून निझामुद्दीन या धर्मपंडिताने तो तयार केला, म्हणून आजतागायत त्याच्या नावावरून हा अभ्यासक्रम ओळखला जातो.) थोडी माहिती देऊ शकाल का?"
 मला त्यांनी अभ्यासक्रमाची माहिती पुरवली. मी विचारले, “या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत काय?"

त्यांनी विचारले, “कोणते बदल तुम्हाला हवे आहेत? कुराण, हदीस यात तर बदल होत नाहीत. फक्त इतर काही नव्या बाबी शिकवल्या जातात. उदाहरणार्थ- भूगोल, उर्दू इत्यादी."

५० । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा