पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 असताना, एका पेपरस्टॉलवाल्याला ‘परचमे-हिंद' आहे का विचारले. तेव्हा तो म्हणाला, 'उनके दफ्तर में मिलेगा. यह पेपरस्टॉल पे नहीं मिलता!' आणि त्याने तुमच्या ऑफिसकडे कसे जायचे, हेही सांगितले."
 "बरोबर आहे. पाहिलेत ना? आजूबाजूला इथे मुस्लिम वस्ती आहे, त्यामुळे माझे घर एवढेच इथे हिंदुस्थान आहे. बाकी मी संपूर्णपणे पाकिस्तानने वेढला गेलो आहे!"
 त्यांनी बाजूच्या फाईलमधून पत्रांचा ढीग काढला.
 "ही पत्रे पाहा. कुणाच्या धमक्या येतात, कोणी मी हिंदूंचे पैसे खात असल्याचा आरोप करतो, तर कोणी इस्लामचा दुष्मन असल्याचा शोध लावतो."
 हातातल्या पत्रांचा ढीग त्यांनी खाली ठेवला आणि म्हणाले, “तंग आ गया हूँ!"
 मी हळूच भीत-भीत म्हटले, “असे निराश होऊन कसे चालेल?"
त्यांनी चष्माच्या कडेतून तिरपे माझ्याकडे पाहिले.
 "तुम्ही मला उपदेश करताय? चाळीस सालापासून मी लढतोच आहे. अब्दुल बारीबरोबर (बिहार काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांचा १९४७ मध्ये खून झाला.) काम केले, सय्यद महमूद मजालिस-ए-मशावरतकडे पळाले. मी मात्र मुस्लिम जातीयवाद्यांशी एकाकी लढतो आहे. असा एकटा किती दिवस लढू?"
 त्यांनी जवळच पडलेला ‘परचमे-हिंद'चा एक अंक माझ्याकडे फेकला. "हे वाचलेत?"
 मी अडखळत ते दोन कॉलमी शीर्षक वाचले. शीर्षक होते : ‘इन्होने भी मारा।' खालचा मजकूर अतिशय बारीक होता. तो वाचायला माझा फारच वेळ गेला असता. मी त्यांनाच सांगितले, "हे काय आहे, तुम्हीच जरा सांगा-"
 ते सांगू लागले,

 "मी पाटण्याला एका सभेत गेलो होतो आणि मुसलमान या देशाविषयी प्रेम बाळगत नाहीत व राष्ट्रगीत म्हणत नाहीत, असे म्हणालो. आता हे म्हणणे चूक आहे का? आज आपल्या देशात खरे सांगण्याची चोरी झाली आहे. सभेत हुल्लड झाली. काही मुसलमान होते, त्यांनी आक्षेप घेतला. खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली. मी म्हणालो, 'आपण सारे राष्ट्रप्रेमी आहात, हेच आपल्याला सांगायचे आहे ना? मग आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी आताच प्राप्त झाली आहे. आता सभा संपल्यावर आपण राष्ट्रगीत म्हणू या. ते सर्वांनी म्हणणे हाच आपल्या राष्ट्रनिष्ठेचा पुरावा होय.' यावर अधिकच हुल्लड झाली. हुल्लडीतच सभा बरखास्त झाली. आता या हुल्लडखोरांना उद्देशून लोकांनी काही बोलायला हवे,पण त्यांना कुणीच काही बोलत नाहीत. लोक मलाच दोष देतात."

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ४७