पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"बिहारच्या काही हिंदू मित्रांनी अनिससुर रहिमान टाळ्या मिळवण्यासाठी हे लिहितो आहे, असे काही वृत्तपत्रांतून म्हटले आहे. म्हणजे मुसलमान दगडांनी मारतात, ही मंडळी शब्दांनी मारतात, म्हणजेच दोघेही मारतातच. या हिंदू मित्रांना उद्देशूनच मी लिहिले : 'इन्होने भी मारा'!"
 मग त्यांनी माझी चौकशी केली. मी कोण, कुठला? गावाचे नाव काय? तालुका, जिल्हा कोणता? माझी राजकीय मते कोणती? कोणत्या राजकीय पक्षाशी माझा संबंध आहे, हेदेखील जाणून घेतले.
 दरम्यान, एक मौलाना आले. त्यांनी विचारले, “आजकाल परचमे हिंदचा अंक पाठवत नाही?" मला ते म्हणाले, “बसा." नोकराला हाक मारून त्यांनी ताजा अंक मौलानासाहेबांना दिला. मौलानासाहेबांनी वर्गणीचे पैसे त्यांच्या हातावर ठेवले. मग विचारले, “मसरुफ हो?"
 "होय. हे मेहमान आले आहेत. मुंबईचे आहेत." मौलाना म्हणाले, “मग मी निघतो."
 ते निघून गेले, तेव्हा अनिससुर रहिमान मला म्हणाले, "हा मनुष्य मोठा नेकीचा आहे. पण विचाराने शेवठी कठमुल्लाच! अजूनपर्यंत मी अनेकांना मोफत अंक पाठवत होतो. आता बंद केले आहेत."
 "परचमे-हिंदचा खप काय आहे?"
 “खप?" त्यांनी मलाच प्रतिप्रश्न विचारला. "किती असेल असे तुम्हाला वाटते?"
 "चार-पाच हजार तरी?"

 “वाह साब! जेमतेम दीड हजार आहे. त्यातील पाचशे मोफत वर्गणीदार. उरलेल्या दीड हजार प्रतींपैकी बाराशे हिंदू वाचतात आणि 'वाहवा, वाहवा, अनिससुर रहिमान, तुम्ही केवढे राष्ट्रभक्त आणि सेक्युलर आहात' असे येऊन सांगत असतात. पण ज्या मुसलमानांसाठी मी हा खटाटोप करतो आहे, ते वाचतच नाहीत. ते 'दावत' पत्र वाचतात. बंगलोरचे 'नशेमन' वाचत असतात. सुशिक्षित मुसलमान रेडियन्स' वाचतात. ('दावत' हे दिल्लीहून प्रकाशित होणारे जमाते इस्लामीचे उर्दू दैनिक आहे. दिल्लीहून 'रेडियन्स' हे इंग्रजी साप्ताहिकदेखील जमाते इस्लामी प्रकाशित करते. 'नशेमन' हे उर्दू साप्ताहिक आहे. जमाते इस्लामीच्याच ध्येयधोरणांचे या साप्ताहिकात समर्थन केलेले असते.) दर आठवड्याला मला किमान पाचशे रुपये नुकसान सहन करावे लागते. न घाटा कम हो रहा है, न कंबख्त मुसलमान बदल रहे है! लेकिन मेरा पेपर बंद नहीं करूंगा. जी में जी है तब तक चलाऊँगा!"

४८ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा