पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचा फोन नंबर हुडकून काढला आणि त्यांना फोन केला. योगायोगाने ते फोनवर सापडले आणि संध्याकाळची वेळ त्यांनी दिली. संध्याकाळी चार वाजता त्यांच्याकडे गेलो, तेव्हा ते ऑफिसमध्ये नव्हते. नोकराने 'गच्चीवर आहेत' असे सांगितले व मला गच्चीवर बोलावले. ते त्या गच्चीच्या जमिनीवर गादी टाकून बसले होते. मागे तक्क्याला रेलले होते. डावा पाय लांब करून एका तक्क्याला टेकवला होता. त्यांना पायाचे कसले तरी दुखणे आहे, हे मला माहीत होते. त्यांनी चष्म्याच्या कडेतून वर पाहिले. मग विचारले, "तुम्ही दलवाई ना? बसा." नोकराला त्यांनी जोरात हाक मारली आणि चहा सांगितला. मग म्हणाले, “एकदा भेटला होता."
 मी म्हणालो, “होय. तेव्हा अतीक (श्री. अतीक सिद्दीकी. हे एक उर्दू पत्रकार आहेत.) तुमच्याकडे काम करत होता. पासष्टच्या युद्धानंतरची गोष्ट आहे. आता दोन वर्षे होत आली."
 "अतीक आता माझ्याकडे नसतो. आणि दोन वर्षांत इतर काहीही बदल झालेले नाहीत. मुसलमान आहेत तिथेच आहेत. पाकिस्तान आहे तिथे आहे. आणि ते हिंदुस्थानशी भांडत राहणार आहे. हे भांडण लवकर मिटणारे नाही."
 मी भीत-भीत म्हणालो, “मी हिंदी मुसलमानांवर एक पुस्तक लिहू इच्छितो, त्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी आलो आहे."
 त्यांनी मधेच अडवून म्हटले, “त्याकरिता माहिती कशाला गोळा करायला पाहिजे? मुसलमान कसे आहेत तुम्हाला माहीत नाही? तुम्ही पुस्तक लिहिताय ना? मग लिहा. सर्व मुसलमान एकजात बेवकूफ आहेत!"
 मी हसत-हसत त्यांना म्हणालो, “हे पुस्तक होत नाही; हे वाक्य होईल."
 "ही थीम आहे. डेव्हलप करा. तुम्ही दहा पुस्तके लिहिलीत, तरी त्यांचा निष्कर्ष तोच काढावा लागेल!"
 मधेच चहा आला. नोकराने नुसताच चहा आणला, तेव्हा ते त्याच्यावर रागावले. त्याला त्यांनी मिठाई व फळे आणायला पिटाळले. दरम्यान, ते बोलत राहिले. मला त्यांनी विचारले,
 "तुम्ही आलात कसे? म्हणजे कुठल्या रस्त्याने आलात?"
 "हमदर्द दवाखान्याच्या बाजूने."
 "तुम्ही येताना किती ठिकाणी पत्ता विचारलात?"
 "तीन-चार ठिकाणी विचारला असेन."
 "ज्यांना पत्ता विचारलात, ते मुसलमान होते?"

 "काही कल्पना नाही." मी म्हणालो, “पण एकाने काही न बोलता गल्ली कासम जान स्ट्रीटकडे बोट दाखवले. दुसरे असे- परवाच जामा मस्जिदकडे आलो

४६ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा