पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मग तो बोलू लागला,
 “मला कळत नाही, कुठल्याही मुसलमानाला भेटलो की तो कसल्या ना कसल्या तक्रारी करतो. सबंध मुस्लिम समाज म्हणजे एक कंप्लेन्ट हाऊस आहे, असे वाटू लागते! त्याचे मित्र मुसलमान असतात. संभाषण मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम इतिहास, मुस्लिम देश आणि पाकिस्तान याच्यापुढे जातच नाही. संभाषणात तो ज्या प्रतिमा वापरतो, त्याही अशाच कशाशी संबंध नसलेल्या असतात. तारिकने स्पेन कसा जिंकला याचे रसभरीत वर्णन करण्यात तो तासनतास गुंगून जातो. पण तो हे सगळे कशाकरता सांगत आहे, हे कळत नाही. या सगळ्यांचा आजच्या दैनंदिन जीवनाशी संबंध काय? खरे म्हणजे, मी एक परंपरागत-रूढीग्रस्त घराण्यात जन्मलो. माझे आजोबा अखिल भारतीय जमायते उलेमाचे अध्यक्ष होते."(मौ. सईद अहमद. ते १९६० ते १९६४ या काळात अखिल भारतीय जमायते उलेमाचे अध्यक्ष होते.)
 मी त्याला विचारले, “फाळणीच्या वेळी दंगलीची झळ तुम्हाला लागली नाही?"
 तो म्हणाला, “लागली होती. परंतु माझ्या आजोबांना लोक ओळखत. त्यांनी वल्लभभाईंना फोन करून पोलीस मागवले. वल्लभभाईंनी पोलीससंरक्षणाची व्यवस्था त्वरित केली. शिवाय हिंदू समाजातील असंख्य मंडळी त्यांना ओळखत. यामुळे आमच्या मोहल्ल्यातील काही मुस्लिम कुटुंबे इथेच राहिली."
 मी त्याला विचारले, "तुम्ही मघाशी म्हणालात की, मुस्लिम नेहमी तक्रार करत असतात. त्या कोणत्या?"
 "बऱ्याचशा तक्रारी तुम्हाला माहितीच आहेत. उदाहरणार्थ- दंगली होतात, सुरक्षितता नाही. आता दिल्लीला फाळणीनंतर एकही दंगा झालेला नाही, तरीही दिल्लीच्या मुसलमानाला असुरक्षितता वाटते; याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही नोकऱ्यांचेच पाहा ना. मला इथे दिल्लीत तरी पदवीधर मुसलमान दीर्घ काळ बेकार असलेला सापडलेला नाही."
 मन्सूर सईदने मला सांगितले, “तुम्ही काही दिल्लीनिवासी मुसलमानांना भेटून जा. त्यांचे मनोगत समजून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल."

दिल्ली २० ऑगस्ट १९६७

 अनिससुर रहिमानना (श्री. अनिससूर रहिमान हे 'परचमे-हिंद' या उर्दू साप्ताहिकाचे संपादक आहेत. एक जुने स्वातंत्र्यसैनिक.) पूर्वी भेटल्याचे आठवत होते.

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ४५