पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्कूलच्या वाचनालयातच कमलेश (तेव्हाचे डॉ. लोहियांचे खास चिटणीस. सध्या 'प्रतिपक्ष' या दिल्लीहून निघणाऱ्या हिंदी पत्राचे कार्यकारी संपादक) भेटला.
 त्याने तिथे लॉनमध्ये उभ्या असलेल्या मुलांच्या घोळक्याकडे मला नेले. त्या मुलांत पंचविशीतील एक सडपातळ, खादीचा कुडता आणि पायजमा घातलेला मुलगा उभा होता. कमलेशने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. त्याचे नाव सईद मन्सूर.
 तो म्हणाला, “आपण कुठे तरी जाऊन बसू या." आणि आम्ही चालतच कॅनॉट प्लेसकडे गेलो. चालता-चालता तो म्हणाला, “दिल्लीचा मुसलमान तुम्हाला जुन्या दिल्लीत सापडेल. आम्ही दिल्लीचे आहोत." तो असे म्हणाला, तेव्हा त्याचे डोळे दिल्लीविषयीच्या अभिमानाने लकाकले. आम्ही कॅनॉट प्लेसला पोचलो, तेव्हा उन्हे उतरली होती आणि जुम्मा मशिदीचे उंच मीनार दूरवर दिसत होते. कॉफी हाऊसकडे आम्ही वळलो.
 तो म्हणाला, “दिल्लीत सुमारे तीस टक्के मुसलमान फाळणीपूर्वी राहत होते. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत बरेचसे पाकिस्तानात निघून गेले. आता मूळ दिल्लीवासी असे दोन किंवा तीन टक्के मुसलमान राहत असतील. कराचीला गेलेले हे मुसलमानदेखील एका वेगळ्या कॉलनीत राहतात. या कॉलनीला 'दिल्ली कॉलनी' असे नाव दिले आहे."
 या कॉलनीत मी एकदा गेलो असल्याचे आठवते. १९६२ मध्ये मी कराचीला गेलो असताना, एका नातेवाइकाला भेटण्यासाठी या कॉलनीत गेलो होतो. आणि तिथे या नातेवाइकाच्या घरमालकाच्या पत्नी अंगणातल्या मोरीत भांडी धूत असल्यामुळे, सुमारे दोन तास घरात अडकून पडलो होतो! मी जायला निघालो की तो म्हणे, “थांब, घरमालकीण भांडी धूत आहे. ती परदानशीन आहे. परपुरुषाने तिच्यासमोरून असे जाणे बरे नाही."
 मी म्हणालो, "तिला दोन मिनिटे घरात जायला सांगा."
 तो म्हणाला, “ती मालकीण आहे. तिला असे सांगणे जमणार नाही."
 “पण मग अंगणात भांडी धूत कशी बसते? हा कसला पडदा आला?"
 "हे बघ, हा वाद नको. इथे असेच वागावे लागेल. हे पाकिस्तान आहे.हिंदुस्थान नाही. तू थोडा वेळ थांब. तिला आत जाऊ दे."
 आणि सुमारे दोन तासांनी तिची भांडी धुऊन झाल्यानंतरच मी तिथून बाहेर पडलो!

 मन्सूर सईदला ही आठवण सांगितली, तेव्हा तो म्हणाला, "हिंदुस्थानातील मुसलमान याहून वेगळे नाहीत. दिल्लीनिवासी मुसलमानांकडे चला. तुम्हाला असाच कडक पडदा आढळेल."

४४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा