पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ज्या उदारमतवादी अल्पसंख्य मुसलमान समाजातून परंपरागत नेतृत्वाचा त्याग केला जाण्याची शक्यता होती, तो जीनांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताने साफ निकालात निघाला, ही हिंद-मुसलमान संबंधांतील एक मोठीच शोकांतिका आहे. भारतात त्याला महत्त्व उरले नाही आणि पाकिस्तानात तो देशद्रोही समजला गेला. या उदारमतवाद्यांच्या प्रवाहाचे संगोपन आपण पुन्हा करणे आवश्यक आहे. पाकिस्तानात ए. के. ब्रोही, जी. एम. सय्यद आदींच्या रूपाने तो अद्याप अस्तित्वात आहे. त्याचबरोबर फाळणीला विरोध करणाऱ्या पाकिस्तानातील गटांची झालेली ससेहोलपट आपण मुकाट्याने पाहत राहण्याचा भयानक गुन्हा केला आहे. सरहद्द गांधी, खान अब्दुल सयदखान, फझलुल हक आणि खिजर हयातखान तिवाना आदींची शोकांतिका ही खरी आपल्या नालायक नेतृत्वाच्या कर्तृत्वहीनतेची शोकांतिका होय. आता ती चूक सुधारली गेली पाहिजे. भारताचे विघटन करण्याचे पाकिस्तानने ठरवले, तरी ते घडवून आणणे तेवढे सोपे नाही. कारण नागप्रदेश अथवा मिझो जिल्हा हा भारताच्या एकूण क्षेत्रफळातील अत्यल्प भाग आहे. तथापि, पूर्व पाकिस्तान अथवा सरहद्द प्रांत म्हणजे तीन-चतुर्थांश पाकिस्तान आणि तेवढा सारा भाग आज असंतोषाने पेटलेला असूनही आपण मुकाट्याने ते पाहत बसलो आहोत. कसलीही अपेक्षा न बाळगता या विभागांतील चळवळींना सातत्याने मदत करीत राहणे आणि पाकिस्तानने प्रहार केल्यास जबरदस्त प्रतिप्रहार करणे, हेच पाकिस्तानबाबतीत धोरण ठेवले गेल्यास भारतपाक संबंध आणि पर्यायाने येथील हिंदू-मुसलमान संबंध स्थिर होण्यास साह्यभूत ठरेल. अखेर हे दोन्ही देश एकत्र येणार असतील, तर केवळ आपल्या लष्करी बळावर आपण आणू, असे समजणे हीदेखील आत्मवंचनाच ठरेल. याबाबतीत पाकिस्तानातदेखील आपल्याला सदिच्छा आणि नव्या प्रवृत्ती निर्माण कराव्या लागतील. हे आपल्याला काळाचे आणि इतिहासाचे आव्हान आहे, ते स्वीकारण्याची जिद्द आपण दाखविली पाहिजे. मुसलमानांनी परंपरागततेचा त्याग केल्याने या कार्याला गती मिळणार आहे. त्याबरोबर मुसलमानांविषयीच्या सार्वत्रिक संशयाला मूठमाती दिल्याने त्यातील अडचणी दूर होणार आहेत. ज्यांना ज्यांना हे कार्य प्रिय वाटते, त्या-त्या साऱ्यांनी एकत्र येऊन हे आव्हान पार पाडले पाहिजे. सध्याचा काळ त्याला अधिक अनुकूल आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

 राज्यघटनेने आपला देश धर्मातीत केलेलाच आहे. या धर्मातीततेच्या आधारेच आपण पुढे पाऊल टाकू या. अल्पसंख्याक जमातींनी खरे म्हणजे धर्मातीततेचा प्रवाह अधिक बळकट केला पाहिजे, कारण त्यामुळे त्यांच्या हक्कांना आपोआपच न्याय्य संरक्षण लाभते. परंतु, मुसलमान लोक

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । ३९