पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धर्मातीतपणाचा उदो-उदो करतात, तेव्हा ते धर्मातीत नसतात; धर्मातीततेचे फायदे फक्त त्यांना हवे असतात आणि जबाबदाऱ्या हिंदूंच्या माथ्यावर झटकून ते पुन्हा वेगळे राहू इच्छितात. हे यापुढे चालू देता कामा नये. आपण सर्वांनी समान अधिकार आणि समान जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. या दृष्टीने दोन्ही समाजांना जवळ आणण्याच्या कामी सर्वांसाठी समान नागरी कायदा क्रांतिकारक ठरेल. शासन जर असा कायदा करीत नसेल, तर शासनाला तो करावयास भाग पाडण्यात आले पाहिजे. मुसलमानांत आधुनिकतेची प्रवृत्ती निर्माण व्हावयास त्यामुळे फार साह्य होईल. वेगळ्या शाळा, वेगळी भाषा, वेगळा शिक्षणक्रम या साऱ्यांनाच आता तिलांजली दिली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान एकत्र येण्याआधी येथील हिंदू-मुसलमान समाज एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे हे विवेचन मी केले आहे, ते अपुरे आहे; परंतु लेखनमर्यादेनुसार पुरेसे आहे, असे वाटते. या सबंध प्रश्नाला अनेक अंगे आहेत. त्या दृष्टीने सर्वांगीण प्रयत्नांची आवश्यकता आहे. परंतु जे प्रयत्न करायचे ते चुकीचे असू नयेत, एवढा मात्र माझा आग्रह आहे. कारण चुकीच्या प्रयत्नांची फळे आपण सध्या भोगतो आहोत.

'वसंत' मासिक :
 

सप्टेंबर १९६६
 
४० । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा