पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भारतीय
मुसलमानांचे
अंतरंग

 भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्व जमातींचे लोक सहभागी झाले होते, असे म्हणता येणार नाही. तथापि, अल्पसंख्याकांतील बऱ्याचशा जमाती कदाचित स्वातंत्र्यचळवळीपासून अलिप्त राहिल्या असतील; मात्र त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्याचे पाप क्वचितच केले. मुस्लिम जमातीने मात्र स्वातंत्र्य मिळणे याचा अर्थ हिंदूंच्या हातात सत्ता जाणे असा लावला आणि स्वातंत्र्यलढा हा हिंदूंचा लढा आहे, अशी स्वातंत्र्यलढ्याची व्याख्या केली.

 याची कारणे स्पष्ट होती. आपण या देशात अल्पसंख्य आहोत, ही जाणीव भारतीय मुसलमानांना झाली होती. आपण अल्पसंख्य असल्याची जाणीव जगातील साऱ्याच मुस्लिम अल्पसंख्य असलेल्या देशांतील मुसलमानांना आहे, हे येथे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. मुसलमान अल्पसंख्य असलेले देश तसे फार नाहीत. इथिओपिया, सोव्हिएट रशिया, युगोस्लाव्हिया या काही देशांत मुसलमान अल्पसंख्याक आहेत. यातील सोव्हिएट रशियातील परिस्थितीचे अखंड भारतातील परिस्थितीशी काहीसे साम्य आहे. अखंड भारतात मुसलमानबहुल सुमारे पाच-सहा घटक राज्ये होती. सोव्हिएट रशियातही मुस्लिम पाच घटक राज्ये आहेत. तथापि, दोन्ही राष्ट्रांतील या इस्लामीकरणाच्या प्रक्रिया अतिशय वेगळ्या आणि म्हणून महत्त्वाच्या आहेत. भारतात मुस्लिम आक्रमणाच्या आणि सत्तेच्या प्रक्रियेतून इस्लामीकरणाची प्रक्रिया निर्माण झाली. दीर्घ काळच्या मुस्लिम सत्तेमुळे येथील मुस्लिम समाजाला सतत सवलती आणि संरक्षण मिळाले. सत्तेचे हे छत्र होते तोवर या जमातीला अल्पसंख्य असल्याची जाणीव होत नव्हती. इथे ब्रिटिश

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । २३