पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कधी खेद वाटत असलेला मला दिसून आला नाही.त्याच्या डोळ्यांत ते पूर्वीचे दुर्दम्य निष्ठेचे पाणी अद्यापही चमकताना मला दिसते. गांधीजींच्या 'हरिजन' पत्राच्या प्रती विकणे, हा त्याचा एक आवडता उद्योग होता. 'हरिजन' बंद पडले, तेव्हा तो ढसाढसा रडला आणि मग काही वेळाने शांत झाला. तेव्हा मुसलमान समाजातील जातीयतेचा धिक्कार करताना उद्वेगाने समोरच्या टेबलावर जोराने हात आपटून म्हणाला, “कंबख्त बदलते नहीं। अभी तक बदलते नहीं!" एका सबंध समाजाचे प्रसंगी अतिरेकी वागणे हे कडव्या धर्मनिष्ठेचे प्रतीक असले, तर त्या समाजाविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या शौकतुल्लांसारख्यांच्या निष्ठेचे मूळ ह्या कडव्या धर्मप्रवृत्तींतच असले पाहिजे!
 -आणि या मतामतांतल्या गलबल्यात भेंडी बाजारसारख्या मुसलमान वस्तीचे बेबंद जीवन सुरळीतपणे व्यतीत होते आहे. नव्या बदलाच्या खुणा जणू ते विसरण्याचा प्रयत्न करीत आहे. भेंडी बाजारचे हे प्रचलित स्वरूप आपल्या राष्ट्रीयत्वातील उणिवांचेच प्रतीक आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाला गेलेल्या तड्याचे ते दुश्चिन्ह आहे.
 नेहरूंनी एकदा मुसलमानांशी जनतासंपर्क जोडण्याची घोषणा केली होती. नेहरूंच्या अनेक घोषणांप्रमाणे तीहीहवेत विरून गेली आणि मुसलमान इतर समाजापासून अलिप्तच राहिले. मुंबईच्या सर्व वस्त्यांत आता विखुरल्या गेलेल्या या समाजाचे अलिप्त जीवन आता हळूहळू संपुष्टात येत आहे. ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुसलमान भारतीय जीवनात संपूर्णपणे सामावले जातील, तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेचे भारताचे स्वप्न पुरे होईल. तोपर्यंत मात्र भेंडी बाजारसारखी मुसलमानांची वस्ती आपल्या राष्ट्रीयतेला गेलेल्या तड्याचीच जाणीव सतत देत राहणार आहे!

किर्लोस्कर मासिक :
 
जुलै १९६५
(मुंबई विशेषांक)
 
२२ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा