पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आले नसते आणि मोगलराजे राहिले असते, तरी ही जाणीव निर्माण झाली नसती. परंतु लोकशाही राजवटीची मागणी बहुजन समाजाने केली असती, तर मुसलमानांनी तिला तीव्र विरोध केलाच असता. थोडक्यात, समान संधीच्या आणि नागरिकांच्या चौकटीत अल्पसंख्याक म्हणून राहावयास मुसलमानांचा मानसिक विरोध होता आणि तो विरोध अद्यापही कायम राहिला आहे. पाकिस्तानची चळवळ आणि निर्मितीही अल्पसंख्याक म्हणून राहावयास मान्यता न देण्याचाच प्रकार होता. तथापि, त्याची परिणती मुसलमान येथे अधिकच अल्पसंख्य होण्यात झाली! (अखंड भारतातील मुसलमानांचे प्रमाण २४.७ टक्के होते, सध्या भारतात ते १२ टक्के आहे.)
 सोव्हिएट रशियातील मुस्लिमबहुल प्रदेश हा झारच्या राजवटीने जिंकून घेतला. तिथे इस्लामीकरणाची प्रक्रिया आधीच होऊन चुकली होती. नव्या राजवटीला (किंवा परक्या राजवटीला) आधी मुसलमानांनी प्राणपणाने विरोधही केला. बुखाराच्या खेदिलने जिहादची घोषणाही दिली होती, परंतु झारशाहीने हा प्रतिकार निष्ठूरपणे मोडून काढला. रशियात क्रांती झाली, तेव्हा मुसलमान या नव्या परिस्थितीशी जुळते घेण्याच्या मनःस्थितीपर्यंत येऊन पोहोचले होते! क्रांतीमुळे त्यांना काहीच गमवावे लागले नाही! कदाचित कम्युनिझमच्या निरीश्वरवादी तत्त्वज्ञानाला त्यांचा विरोध झाला असेल; परंतु साऱ्या कम्युनिस्टविरोधकांना जसे चेचून काढण्यात आले, तसे या मुस्लिम कम्युनिस्टविरोधकांनाही चेचून काढण्यात आले. फुटीरपणाच्या चळवळी दडपून टाकण्यात आल्या आणि आधुनिकीकरणाची एक प्रचंड प्रक्रिया या प्रदेशातही सुरू करण्यात आली.
 त्याचबरोबर या प्रदेशात रशियनांची वसाहतही सुरू झाली. ह्या वसाहत करण्याच्या धोरणामुळे लोकसंख्येच्या स्वरूपात हळूहळू बदल करण्यात आला. हा बदल अद्याप होतोच आहे. थोडक्यात, लोकशाहीच्या आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या चौकटीतील समान नागरिकत्वाला रशियातील मुसलमानांनी अल्पसंख्याक म्हणून विरोध केलाही असता; त्यांना तशी संधी देण्यात आली होती. (काश्मिरात भारतातील नागरिकाला स्थायिक होता येत नाही, हे या संदर्भात आठवल्याखेरीज राहत नाही!)

 इथिओपियात या मानसिक संघर्षाला आता आरंभ झाला आहे. इथिओपियातील मुस्लिम अल्पसंख्याकांचा प्रश्न हा भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांच्या पद्धतीने सोडवण्यात यावा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय इस्लामिक नियतकालिके करू लागली आहेत. सोमालिया आणि इथिओपिया यांच्यामधील सीमा-संघर्ष हा इथिओपियातील मुसलमानांच्या या मानसिक अवस्थेचेच प्रतीक आहे. अल्पसंख्याक म्हणून ते इथिओपियात राहावयास तयार

२४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा