पान:कविता गजाआडच्या.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विविधांगी कार्य करणाऱ्या. राष्ट्रसेवादलाच्या संस्कारांच्या मुशीतून घडलेल्या कार्यकर्त्या, आपल्या कामासंबंधी सतत अभ्यास करीत, मनन-चिंतन करीत त्याविषयी लेखन करणाऱ्या लेखिका, जीवनातले उग्र, भीषण, करूण, खंबीर वास्तवातले अनुभव घेत आपली मुळातली संवेदनशीलता अधिक जाणकारीने कविताबद्ध करणाऱ्या कवयित्री आणि माणूसवेड्या. हसत मुख, अखंड मैत्रभाव मुरलेले व्यक्तिमत्त्व म्हणून जाणकारांना, महाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीला परिचित आहेत.
 ऐन तरुणवयात राष्ट्रसेवादलाच्या आणि घरातील माता-पित्यांच्या जनसेवेच्या संस्कारात वावरत असतानाच एका ध्येयवादी तरुणाची साथ जन्मभरासाठी स्वीकारली आणि उभयतांनी रूढ प्रपंच 'नेटका' करीतच आपले 'मानवलोक' आणि 'मनस्विनी' हे उंबऱ्याबाहेरचे विस्तृत प्रपंचही स्वतंत्रपणे परंतु परस्परांना संवादी राहत विस्तारले आहेत. सात सुरांनी आपआपल्या सुरांचे स्वतंत्र अस्तित्व राखीत सुमधूर मेळ असलेल्या सतारीसारखी उभयतांची कार्ये आणि व्यक्तिमत्त्चे स्वायत्त आणि तरीही सुसंवादी राहिली हा सगळ्यात विलोभनीय आणि उल्लेखनीय भाग आहे.
 विवाहानंतर प्रपंचातली सगळी कर्तव्ये करीतच आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शैलाताईंनी दीर्घकाळ महाविद्यालयीन अध्यापक म्हणून कामही केले. नुकत्याच त्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्या आहेत आणि जणू दुसऱ्या तारुण्यात पदार्पण करून नव्या उत्साहाने कार्यमग्न होत आहेत.
 ह्या सगळ्या उपद्व्यापात त्यांची कविताही सतत त्यांच्या सोबत राहिली. ग्रामीण-अर्धग्रामीण भागातल्या स्त्रियांना त्यांच्या अनंतप्रकारच्या अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी हात देताना, थकून अगतिक झालेल्या माय-बहिणींमध्ये उमेदीची पेरणी करताना, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी निरनिराळे उद्योग उभे करताना, त्यांना केवळ 'देहस्विनी' पणात जखडून टाकणाया मानसिकतेचे आतले-बाहेरचे. मनातले-जनातले बंध खंबीरपणे पण हळुवार हातांनी सोडवून त्यांना 'मनस्विनी' म्हणून आपल्या पायावर उभ्या करताना, बाईच्या जातीचे अनेक बरे वाईट अनुभव शैलाताईंचे संवेदनशील मन टिपत आले आहे. आपले स्वतःचे आयुष्य सुस्थितीत आणि सुरक्षित असले तरी समाजातल्या एकूण स्त्रियांची कोंडी आणि घुसमट त्यांना अस्वस्थ करीत राहिली. त्या उपेक्षितांची वेदना शैलाताईंनी सहवेदना म्हणून अनुभवली. त्यांची 'मनस्विनी' म्हणून घडण होत असतानाचे खंबीर बळही अनुभवले अशा व्यापक स्त्री सहानुभवातून शैलाताईंची कविता जन्माला आली आहे.
 तरीही ती कडवट झाली नाही. जीवनातले, निसर्गातले कोवळेपण, हळुवारपण, प्रसन्न सर्जनाचे उन्मेषही त्यांच्या कवितेने निर्मळपणे टिपले आहेत. अशा जागा अर्थातच