पान:कविता गजाआडच्या.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमी आहेत कारण त्या जागा बाईच्या जीवनातच कमी असाव्यात. एरव्ही चारी अंगांनी दृश्य -अदृश्य गजांची बंदिस्तीच बाईभोवती फार! म्हणून या कविता 'कविता गजाआडच्या' आहेत. पण बंधनाबाहेरचे आकाश पाहू इच्छिणाऱ्या आहेत. बंदिस्ती उखडून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या आहेत. अगतीकतेतूनही नवी वाट शोधू पाहणाऱ्या आहेत.
 स्त्रीचं मातीपण त्यांच्या कवितेचा गाभा आहे. माती हा आधार जगण्याचा तरी उपेक्षित, माती हा सर्जनाचा गर्भ तरी उपेक्षित, माती हा जीवनातल्या रंग-गंधाचा मूलकंद तरी उपेक्षित. तरीही माती, आपल्या मातीपणाला घट्ट चिकटून आहे. बाई आपल्या बाईपणाची उपेक्षा झटकूनही बाईपणाचं सर्जकतेचं सामर्थ्य ओळखून ताठ मानेने उभी राहू पाहणारी आहे.

"न्हात्याधुत्या मातीचा
शिनगार साजिंदा
सावळीया रूपाले
भुलला वो गोईदा !!.....

किंवा

"न्हात्याधुत्या मातीचे
भाळ कोनी गोंदले
नादावले आभाळ
काठावर झुकले ॥"

अशा अलवारपणाने बाईची आणि मातीची गर्जनशीलवा त्यांच्या कवितेत येते ('संग')
 स्त्रीचे हे प्राकृतिक रूप जीवनाच्या धकाधकीत जेव्हा मातीमोल होते. तिचे फुलणेबहरणे धर्माच्या, संस्कृतीच्या, मर्यादेच्या नावाखाली खुरटवून टाकले जाते, तेव्हा कवयित्री सात्त्विक उद्वेगावे म्हणते,

"किती वर्षे अजून
खुरट्या पानांचे उत्सव.... आणि
मातीत हाराकिरी करणाऱ्या
रामाच्या सीतेचं कौतुक ?...."
    (कविता माझ्या तुझ्या)