पान:कविता गजाआडच्या.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुणाविते चन्द्रावळ...

हिरवळ हिरवळ
रेशमाच्या जावळाची
अगंभर सळसळ..

हिरवळ हिरवळ
पाखरांच्या पंखावर
थरथरते आभाळ...

हिरवळ हिरवळ
बाभळीच्या दिवाळीची
पितांबरी झुळझुळ...

हिरवळ हिरवळ
काळजात कालविते
विषभरे काळेजळ...

हिरवळ हिरवळ
डोळाभर तुडुंबली
दहादिशांची ओंजळ...

हिरवळ हिरवळ
काजळाच्या डोळियांची
खुणाविते चन्द्रावळ...

कविता गजाआडच्या /६२