पान:कविता गजाआडच्या.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोनियाच्या भावलीला । राम तुम्ही दिला मान ॥
हाडामासांची वाईल । तिचं तुडविलं मन ।
तवापासून संपेना । साता जल्माचं दळनं ।
शेजीबाई आता पाह । नव्या रामाचं सपन ||"
   (साता जल्माचं दळन)

ही सगळीच कविता नव्या-जुन्या अवघ्या स्त्रीमनाचं 'सीतायन' आहे
 अगदी बिजींगच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला जातानाही भवभूतीच्या सीतेच्या व्यथेची कथाच आठवते पण आताची सीता मात्र तेव्हासारखी अंधपणाने रामनाम जपत राहणार नसल्याची ग्वाही देते आणि हे भान आणून देण्याला कारणीभूत झालेल्या रावणाचे आभार मानते. हा उपरोध बोचक आणि मार्मिक आहे.
 पुरुषकेंद्री आणि पुरुषी 'अहं' चा संहारक उद्दामपणा घेऊन आलेले तथाकथित वैज्ञानिक शोधांचे उपयोग पुन्हा स्त्रीची प्राकृतिक निर्भर सर्जकता उच्छेदून टाकण्याकडे वाटचाल करीत आहेत. क्लोनिंगद्वारे पुनर्संभवाच्या द्वारे जणु स्त्रीचे अस्तित्व खुडून टाकले जाण्याची शक्यता असेलेले उग्र भीपण भाकितही पुन्हा- 'मातीत... रामपत्नी सीताईसारखे...!" या शब्दातूनच व्यक्त होते ( चैतन्याचे सैंधवी झाड)
 'सीते' ची अशी विविधांगांनी दर्शन घेताना कवयित्रीचा चिवट आणि युयुत्सु आशावाद "पुन्हा जन्माला येतेय सीता ..." मधून कणखरपणे व्यक्त होतो.
 वाल्मिकी आणि भवभूती यांच्या दमित सीतेपेक्षा कवयित्रीला व्यास महर्षीनी द्रौपदीसाठी योजिलेल्या 'अग्निशिखा, भाविनी आणि मनस्विनी' अशा विशेषणांनी युक्त सीतेची भविष्यात प्रतीक्षा आहे, नव्हे तशी ती येईल अशी खात्री आहे.

".... आणि... दगडी वृंदावनाचे चिरं फोडून
पुन्हा एकदा जन्माला येतेय
'भूमिकन्या' सीता
नवे रामायण लिहिण्यासाठी....."
   (पुन्हा जन्माला येतेय सीता..)

 राम-सीतेच्या मिथकाचा असा पुन:पुन्हा आधार घेत आज 'गजाआड' असलेल्या स्त्रीचे आशादायक भविष्य शैलाताईंच्या कवितेतून व्यक्त होते.
 ओवी हा मराठीतील जणू आदिछंद ! येथील स्त्रीचा सहज छंद ! मुक्त छंद, गझल