पान:कविता गजाआडच्या.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'सीता' ही आदिम भू देवता! नांगरलेसी भूमी ! तिने पीक-पाणी देऊन जीवन समृद्ध करावं म्हणून कोणे एके काळी 'सीतायज्ञ' -कृषिजीवनातील सुफलीकरण विधी होत असे, असे म्हणतात. पण काळाच्या ओघात भूमी आणि भूमीरूपा नारी केवळ 'नांगरून', 'ओरबाडून' 'उत्पादन करण्याचे साधन' एवढाच उद्देश राहिला. सीते ची स्वतंत्र सर्जक अस्मिता उच्छेदून केवळ 'रामा' च्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या अहंतृप्ती पुरुषार्थाचे साधन एवढीच सीतेची किंमत राहिली. अखिल मानवजातीसमोर असा अहंयुक्त 'राम' आणि अशी अगतिक 'सीता' हेच आदर्श ठेवले गेले. ही प्रतिके एकुणच स्त्री-पुरुष जीवनातील संवादी समपातळीवरील विलोभनीय नर-नारी जीवनातील संवाद संपवणारी ठरली. स्त्रीच्या जीवनाची परवड या व्यवस्थेने केली. याचे लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या शैलाताईंना फार चांगले भान असल्याने असेल पण स्त्रीच्या स्थिति-गतीचा मागोवा घेताना राम-सीतेच्या मिथकाचा पुनः पुन्हा उल्लेख त्यांच्या कवितेत येतो. रामाने सीतेची केलेली उपेक्षा हा समस्त पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्री जीवनाच्या केलेल्या अधिक्षेपाचा वस्तुपाठ या संस्कृतीने आदर्श मानला. तेव्हापासून 'रामायण' संपले आणि 'सीतायन' सुरू झाले, असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. अगदी भारतीय परंपरेतील जात्यावर दळण दळणाऱ्या अनक्षर स्त्रीला सुद्धा रामाने सीतेची केलेली अवहेलना आणि उपेक्षा सहन झाली नाही. व्यथा आणि सात्विक संताप अशा संमित्र भावनातून जात्यावरच्या अनेक ओव्यातून येथील स्त्री मनाने राम-सीतेचे मूल्यमापन करताना सीतेला झुकते माप दिले आहे. त्याच जाते संस्कृतीतील कवयित्रीचा वारसा नवयुगातल्या कवयित्री शैलाताईंनी पुढे नेला आहे.

"काळ्या मातीच्या देहाचा
झुरे काठोकाठ प्राण
सीताईच्या शपथांनी
आजवेरी उरे त्राण......"
   (उगवाईच्या दारीचा)

अशा उद्गारांतून माती-सीता आणि तिची बाईपणाशी असलेली सनातन बांधीलकी व्यक्त होते.

"सीतामाईच्या रामानं | दिला घालूनिया धडा ।
घरीदारीच्या रामानं । तंतोतंत गिरविला ||
फाटलेल्या पदरानी । कसे झाकू लहू-कुश ।
टाकलेल्या सीताईची । हरविली भुई कूस ॥