Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दीपाबाई
 


व नातेवाइकांनीं पुष्कळ सांगून पाहिलें; पण फ्लोरेन्स मुळींच बधेना. ती म्हणे मनुष्यमात्रावर उपकार करावयास या धंद्यांत उत्कृष्ट संधि मिळते; आणि म्हणून चांगल्या माणसांनीं त्यांत प्रवेश केला, तर त्याचें स्वाभाविक वैभव त्याला प्राप्त होईल.
 आपलीं नित्याचीं कामें नीट रीतीनें करावीं, व उरलेला वेळ गरिबांचीं घरें धुंडाळण्यांत घालवावा, असें फ्लोरेन्स करूं लागली. काबाडकष्ट करणारे लोक, रोजंदारीनें खपणारे लोक, यांना आजारीपण आलें, तर त्यांची उस्तवास्त कोण करतो? त्यांनीं तसेंच विव्हळत पडावें, व औषधावांचून व अन्नपाण्यावांचून तडफडावें, अशी स्थिति असे. पण फ्लोरेन्स ही कोणाच्याहि भल्याबुऱ्या मताची पर्वा न करतां अशा लोकवस्तींत जाऊन आजाऱ्यांची शुश्रूषा करूं लागली. तिचें हें वेड जावें, म्हणून वडिलांनीं तिला प्रवासासाठीं परदेशीं धाडलें. पॅरिस, रोम अशांसारखीं शहरे व स्वित्झर्लंडमधील मनोरम देखावे पाहिल्यानें तिच्या वृत्तींत बदल पडेल, असें त्यांना वाटलें होतें. पण त्या त्यांच्या इलाजाचा परिणाम अगदींच विपरीत झाला. ती ज्या गांवीं जाई, तेथें जीं मोठमोठीं इस्पितळे असतील त्यांत जावें, व रुग्ण शुश्रूषा करावयाच्या कोणत्या पद्धती तेथें चालू आहेत हें पहावें, असा क्रम तिनें आरंभिला. रोममध्यें तर कॅथॉलिक भगिनीमंडळाने चालविलेलें हैं शुश्रूषेचें काम पाहून तिला फार आश्चर्य वाटलें. जर्मनीमध्यें ऱ्हाइन नदीच्या कांठीं कायझर्सवर्थ येथेंहि अशाच तऱ्हेचें मोठें नमुनेदार काम चालू असलेले तिनें पाहिलें. पॅरिसमध्येंहि 'धर्म-भगिनी' म्हणून तिनें या कामाचा थोडासा अनुभव घेतला. आपल्या इंग्लंड देशांत मात्र अशा प्रकारची कांहीं संस्था नसावी, याची तिला चुटपूट लागून राहिली; व परत येतांच ती त्याच उद्योगास लागली.
 याच सुमारास सिडने हर्बर्ट या तरुण आणि उदारमनस्क माणसाची व तिची मैत्री झाली. हा गृहस्थ मोठा रुबाबदार आणि पाहतांच लोकांच्या मनांत भरावा असा होता. या उभयतांची मैत्री जमत आहे, असें दिसतांच लोकांनीं निरनिराळीं अनुमान काढावयास आरंभ केला. पण सिडने हर्बर्ट याचे लग्न आधींच झालेलें होतें; आणि शिवाय फ्लोरेन्स हिच्या मनांत लग्नाचा विचार सहसा येतहि नसे. वास्तविक स्थिति अशी होती कीं, फ्लोरेन्स हिंचें मन जसें भूतदयान्वित असे, तसें हर्बर्ट याचेहि असे. दोघांच्याहि मनाचा प्रमुख धर्म एकच होता; आणि म्हणून त्यांची मैत्री जमली. हर्बर्ट यानें फ्लोरेन्सनें मनांत धरलेला हेतु पसंत केला; इतकेंच नव्हे, तर तो सफल व्हावा, म्हणून तिला परोपरीचें साह्य केलें, त्याचे