Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कर्तबगार स्त्रिया
 


उदार मन, थोर विचार, आणि सुरस भाषण यांचा फ्लोरेन्सच्या बापाच्या मनावरहि मोठाच परिणाम झाला होता. त्यानें नाइटिंगेल यांना सांगितलें कीं, 'या नर्सच्या कामांत वाईट असें कांहीं नाहीं. इंग्लंडमध्ये जरी त्याचें रूप हीन असले, तरी खास युरोपांत या धंद्याचा महिमा मोठा आहे; इतका कीं, त्याची गणना धर्मकृत्यांत होते.' हळू हळू नाइटिंगेल यांचेहि मन बदलूं लागलें; व फ्लोरेन्सला घरांतून फारसा विरोध राहिला नाहीं.
 शुश्रूषिका म्हणजे नर्सेस तयार करावयाची संस्थाच आपण काढली पाहिजे, असें तिच्या मनानें घेतलेलें असल्यामुळे त्या संस्थेत ज्या स्त्रिया येतील, त्यांना शिक्षण देण्याची आपली स्वतःची तयारी पाहिजे, हें ओळखून तिनें जर्मनी, फ्रान्स, इत्यादि देशांतील संस्थांत स्वतः शिक्षण घेतलें. जर्मनींतल्या संस्थेत तर शिक्षण अगदीं कडकडीत असे. जी गरिबांची सेवा करावयास जाणार, तिनें स्वतः आपली राहणी गरिबीचीच ठेवावयास हवी, व हरतऱ्हेचे कष्ट करण्याची संवय लावून घ्यावया हवी, हें धोरण ठेवून संस्थाचालकांनीं तेथील दिनचर्या अगदीं तापशाला साजेल अशीच ठेवलेली होती. सुप्रभातीं उठावें, सडासंमार्जन करावें, युक्त व परिमित आहार करावा, अध्यापिकांनी दिलेली संथा नीट समजावून घ्यावी, जेथें कोठें रुग्णपरिचर्या करावयाची असेल तेथें ती सद्भावनेनें व आनंदी वृत्तीने करावी, असे तेथील शिक्षण असे. तसेच, शुश्रूषा किंवा परिचर्या हें जें हळूहळू शास्त्र बनत चाललें होतें, तेंहि अभ्यासावें अशी सक्ती असे. या शिक्षणाचा फ्लोरेन्सला फार उपयोग झाला. तिचे स्वतःचे मन मुळांत मोठें प्रतिभाशाली असून त्या विषयाच्या अविरत चिंतनानें शुश्रूषेविषयीं तिला नाना प्रकारच्या कल्पना सुचत. त्यांतच या शिक्षणाची भर पडल्यामुळे संस्था चालविण्यास तिला पूर्ण योग्यता प्राप्त झाली. लंडनला परत येऊन काय करतां येणें शक्य आहे, हें पाहून अधिक अभ्यासासाठीं ती पुन्हा पॅरिस शहराला गेली. याप्रमाणे स्वाभाविक प्रवृत्ति, धर्मबुद्धि, आणि शिक्षण यांचा उत्तम संयोग जमून फ्लोरेन्स ही आपल्या जीवितांतील प्रमुख कामाला सर्वथा पात्र झाली.
 १८५३ या वर्षी लंडनमधील "रुग्ण-स्त्री-शुश्रूषा-मंदिर" या संस्थेचें काम तिनें आपल्या हातीं घेतलें. तेथें तिनें नाना प्रकारचे प्रयोग सुरू केले. आजाऱ्याची जागा, त्याचें अंथरूण-पांघरूण व त्याचें शरीर हीं अगदीं स्वच्छ ठेवावयास हवीं, असा दंडक तिनें घातला. वास्तविक, आपल्या आतांच्या कल्पनेप्रमाणें पाहतां, यांत नवीन