Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
कर्तबगार स्त्रिया
 


स्त्री वाजत-गाजतच आपल्या घरीं परत आली! तिचा हा पराक्रम ऐकुन, सर्व देशाच्या अंगावर शहारे उभे राहिले; आणि जिकडे तिकडे तिच्या नांवाचा जयघोष होऊन घरोघर ध्वजातोरणें उभी राहिली.
 येथून पुढें चीन देशावर एक नवीनच संकट कोसळले, पाश्चात्य लोकांशीं स्पर्धा करावयाची, तर सवर्णीय चीन लोकांशी मैत्री जोडावी, व त्यांनीं आणि आपण एक होऊन, युरोपियन लोकांना पूर्व आशियांतून पिटाळून द्यावें, हें न करतां, जपानी लोक साम्राज्यवादी बनले; आणि त्यांनीं चीन देशावरच स्वारी केली. चँगनें आपला मोहरा आतां जपानी लोकांच्या विरुद्ध वळवला; आणि मग मेलिंग हिची हालचाल एकाद्या सेनापतीप्रमाणें चालू झाली.
 विमानांतून उड्डाणें करावीं, फौजांच्या हालचालींच्या योजना सिद्ध करण्यासाठीं शिबिरा- शिबिरांतून हिंडत रहावें, असले काम मेलिंग ही नवऱ्याच्या बरोबरीनें करूं लागली. जपान्यांची स्वारी मारून काढण्याच्या कामीं चँग-कै-शेक याला बरेचसें यश मिळाले; या यशांतील निम्मा वाटा प्रपंचांतील त्याच्या वांटेकरणीकडे जातो, हे सर्वांनी मान्य केलें आहे.
 दुसरे महायुद्ध सुरू झालें; जपानी राष्ट्र जर्मनांच्या बाजूला गेलें; आणि चीनी राष्ट्र अँग्लो-अमेरिकनांच्या बाजूला गेलें. मग स्टॅलिन, रुझवेल्ट, चर्चिल अशा लोकांच्या भेटी घेण्यासाठीं मदाम चँग-कै-शेक हिला सर्व जगाच्या फेऱ्या कराव्या लागल्या. ती एकदां हिंदुस्थानांतही येऊन गेली.
 पण पुढें चँग व चिनी कम्युनिस्ट यांचें वैर जुंपलें, आणि दोस्तांची मदत पुरेशी न मिळाल्यामुळे चँगची पिछेहाट होऊं लागली. आज चँग हा फोर्मोसा बेटावर तीन-चार लक्ष फौज घेऊन बसलेला आहे. त्याची वेडी आशा अशी आहे कीं, चीन देशावर पुन्हां आपल्याला स्वारी करतां येईल. मदाम चँग-कै-शेक असल्या कानकोंड्या स्थितींत नवऱ्याला कसला सल्ला देत असते, हें कळावयास कांहींच मार्ग नाहीं; पण चिनी राष्ट्र जरी तिला आतां विसरलेलें असले, तरी चीन देशाचा आणि स्त्रीजातीचा इतिहास तिला कधींही विसरणार नाहीं!

● ● ●