Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम चँग-कै-शेक
२३
 


-कै-शेक यांना सोडविण्यासाठीं तुम्हीं चाल करून जाणार आहां. पण मी सांगतें कीं, हा तुमचा बेत तुम्ही रद्द करा. चँग यांना मी स्वतःच सोडवून आणतें.' हा निरोप पोहोंचतांच वाटचाल करूं लागलेली चँगची सैन्यें थबकून उभीं राहिलीं. ही बाई नवऱ्याला सोडवून आणणार म्हणजे काय करणार, याकडे सगळें राष्ट्र उत्सुकतेनें पाहूं लागलें.
 चँग याला आपल्या बायकोचा स्वभाव पुरा माहीत झालेला होता. तिला चैन पडावयाचें नाहीं; आणि आपल्याला सोडविण्यासाठीं कांहींतरी अघटित कामाला ती हात घालील, असें त्याला वाटू लागलें. इतक्यांत, तिचा बेतही त्याच्या कानीं आला. त्याने निरोप धाडला कीं, 'तूं असलें कांहीं करूं नकोस; तूं आलीस तर हे लोक तुला ठार मारतील.' परंतु, नवऱ्याचा निरोप आणि स्वकीयांची हरकत हीं या बाईनें बाजूला सारली. तिनें एक विमान घेतलें; आणि बरोबर एक हुजऱ्याही घेतला. तिने त्याला सांगितलें कीं, 'शत्रूच्या शिबिरांत जाऊन पोहोंचल्यावर जर तेथले शिपाई माझ्या अंगाला हात लावून हिसकाहिसक करूं लागले, तर तूं मला गोळी घाल.'
 येतां येतां विमान शत्रूच्या तळावर येऊन उतरलें; आणि हातीं भरलेलें पिस्तुल घेतलेल्या या हुजऱ्याला बरोबर घेऊन मेलिंग ही चँगच्या कैदखान्याकडे निघाली. दोन्ही बाजूला उभे असलेले सैनिक विस्मित होऊन तिच्याकडे पाहूं लागले. लाखों संगिनींनीं गजबजलेल्या शत्रूच्या तळांत ही बाई निर्भयपणें प्रवेश करते, आणि नवऱ्याला सोडवीन म्हणते, याचें या शिपायांना मोठेंच नवल वाटलें. जातां जातां ती नवऱ्याच्या खोलीपाशीं पोहोंचली. तिचें धाडस पाहून चकित झालेल्या शत्रूंनीं तिला कसलीही हरकत केली नाहीं. चँगनें अन्नत्याग केलेला होता. ती त्याला म्हणाली, 'तुम्ही असें करूं नका. तुम्ही अन्न खा. कारण, अन्नमय प्राण आहे.' इतकें बोलून, त्याच्या चित्ताला शांति यावी, म्हणून धर्मग्रंथांतील कांहीं वचनें तिनें वाचून दाखवली.
 दोन दिवस ती तेथें राहिली; आणि शत्रूशीं तिनें सारखी रदबदली केली. 'माझ्यासाठीं नव्हे, पण चीन देशासाठीं तुम्हीं यांना सोडून द्या; सोडलें नाहींत तर यांच्या लक्षावधि फोजा तुमच्यावर चालून येतील; आणि सर्व देशभर यादवीचा डोंबाळा माजेल.' शत्रूंना तिची ही रदबदली पटली; आणि १९३६ च्या नाताळांत त्यांनी चँगला बायकोच्या हवाली केलें. नवऱ्याला घेऊन, ही धीट आणि पराक्रमी