Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
कर्तबगार स्त्रिया
 


लोकांच्या खोपट्यांत आणि रकट्यांत खऱ्या ज्ञानाचें अस्वास्थ्य उत्पन्न केलें; पण यांतूनच एकदां एक मोठे चमत्कारिक संकट उद्भवलें.
 चँगचे हे वर्तन पसंत नसलेल्या आणि कदाचित त्याच्या प्रभावाने दिपून गेलेल्या कांहीं सैनिकी अधिकाऱ्यांनी त्याला अचानक उचलून नेलें. चँग-कै-शेक एकाएकी नाहींसा झाला; आणि सर्व देशभर हलकल्लोळ झाला. तो कोठें आहे, आणि त्याला कोणी धरून नेले आहे, याचीही वार्ताच लोकांना लागेना. होतां होतां हे बदमाश लष्करी अधिकारी कोण, याचा पत्ता लागला. पुढें असेंही कळलें कीं, हे लोक मोठे फौजबंद सरदार असून दोन लक्ष सैनिकांचा गराडा त्यांच्या शिबिराच्या भोंवतीं पडलेला आहे. या शिबिरांत त्यांनीं चँगला डांबून ठेवलें होतें. ते त्याला म्हणत कीं, 'तूं पुढारीपण सोडून दे; आणि चीन देशाची सूत्रे आमच्या हातीं दे.' चँगनें त्यांना खडसावून सांगितलें कीं, 'जीव गेला, तरी बेहत्तर; पण ही गोष्ट कदापि होणार नाहीं. तुम्हीं चारटे लोक आहां.' या त्याच्या खडसावणीला त्यांनीं येवढेंच उत्तर दिलें कीं, त्यांनीं त्याला जखडून बंदिखान्यांत घातलें. पण पहारेकऱ्यांचे थोडेसे दुर्लक्ष झालें आहे, असें पाहून चँग त्यांच्या कोंडाळ्यांतून निसटला; एका उंच तटावर चढला; खाली उडी घालतांना खंदकांत पडला; पण तसाच खुरडत खुरडत तो एका दूरच्या डोंगराकडे गेला. चँग पळाला; हे ऐकतांच त्याच्या पळाच्या दिशेनें भराभर गोळ्या सुटू लागल्या; आणि बाँम्बगोळेही पडूं लागले. जातां जातां कांटेरी झुडपांत लपलेल्या गुहेत तो जाऊन बसला. त्याला उभेही राहतां येईना. शेवटीं त्या अधिकऱ्यांचे शिपाई तेथें येऊन ठेपलें. तेव्हां आपल्या सर्व सत्ताधिकाराचा रोष एकत्र करून तो त्यांना म्हणाला, 'छाती असेल तर मला गोळी घाला; नाहीं तर माझी पदवी मरून मला सलाम करा!' त्याला त्यांनीं धरून नेलें.
 चँगच्या बंदिवासाची ही वार्ता सर्व देशभर पसरली; आणि त्याच्या स्वतःच्या फौजा त्याला सोडविण्यासाठी सज्ज होऊन राहिल्या. याच ठिकाणीं मेलिंग हिच्या अंगचें लोकविलक्षण धैर्य आणि तिचा आत्मविश्वास हीं सर्व जगाच्या प्रत्ययाला आली.
 चीन देशांत आतां यादवी माजणार, आणि दोन्ही बाजूंच्या लाखों सैनिकांचा चुराडा होऊन खुद्द चँगचें जीवितही संशयांत सांपडणार, हें मेलिंग हिनें ओळखलें; आणि तिनें, चँगच्या सैन्यावरील अधिकाऱ्यांना निरोप धाडला कीं, 'चँग