Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
कर्तबगार स्त्रिया
 


प्रत्यक्ष रणांगणावरून जाऊन आली. शेवटीं तिने सरकारांत लिहून धाडलें कीं, दारूगोळा आणि कवाईत यांची शिपायांना जितकी आवश्यकता आहे, तितकीच ताज्या अन्नाचीसुद्धां आहे; आणि अधिकाऱ्यांच्या खणपटीस बसून तिनें तीहि सुधारणा घडवून आणली. पण अशा प्रकारें दुखणाइतांची आणि जखमी झालेल्यांची निगा राखतां राखतां तिला स्वतःलाच दुखणें येऊं लागलें. ताप येतां येतां तो इतका येऊ लागला कीं, ही आतां जगत नाहीं, असें लोकांना वाटूं लागलें. तिनें चालविलेल्या अखंड सेवेची वार्ता 'टाइम्स्' व इतर पत्रे यांच्या द्वारां सगळ्या इंग्लंडांत दुमदुमून राहिलेली होती; व त्यामुळे इंग्लंडची ही संरक्षक देवता आहे, असें लोकांना वाटूं लागलें होतें. म्हणून तिला जिवावरचें दुखणें आलें आहे, हें वर्तमान इंग्लंडमध्ये येऊन थडकलें, तेव्हां सर्व देश तिच्यासाठी हळहळू लागला. सुदैवानें तिच्या दुखण्याला उतार पडला; व हळूहळू तिला बरें वाटूं लागलें. पण दुखण्यानें तिच्या डोक्याचे केस गळाले; आणि तिची प्रकृति जी एकदां ढासळली, ती पहिल्यासारखी पुन्हां कधींच झाली नाहीं. तिचें बरें आहे असें ऐकून लोकांनीं सुखाचा उच्छ्वास टाकला; आणि राष्ट्रावरचें संकट टळलें, म्हणून त्यांनीं देवळां- देवळांतून परमेश्वराचें नामसंकीर्तन केलें. खुद्द व्हिक्टोरिया राणीनें तिच्या समाचारासाठीं पत्र लिहिलें; आणि 'बाई, तुम्ही परत आलांत, म्हणजे तुम्हांला भेटावयास मला किती आनंद होईल म्हणून सांगूं!' असे उद्गार काढले.
 थोडें बरें वाटतांच तिनें आतां इंलंडाला परत जावें, म्हणून अधिकाऱ्यांनी आग्रह धरला. परंतु तिनें स्वच्छं सांगितलें कीं, क्रिमियांत एक तरी शिपाई आहे, तोंपर्यंत मी येथून हलणार नाहीं; माझें कांहीं बरेवाईट झालें तरी चालेल. पण सुदैवानें लवकरच युद्ध आटोपलें आणि मांडलेल्या कामाच्या पसाऱ्याची चार महिन्यांत आवरा- सावर करून फ्लोरेन्स ही घरी परत जाण्यास निघाली. ती परत येणार, हें ऐकून सर्व राष्ट्राला कृतज्ञतेचें भरतें आलें! तिला कांहीं अहेर करावा, म्हणून लोकांनी वर्गणी केली; ती आठ लक्ष रुपये भरली! किनाऱ्यावर उतरतांच आणि तिच्या घरच्या मार्गावर तिचा जाहीर सत्कार करावा, म्हणून लोकांनीं व्यवस्था केल्या; पण ह्या विनयशील स्त्रीने आडवाटेनेंच घराकडे कूच केलें.
 राष्ट्रानें बक्षिस दिलेलें आठ लक्ष रुपये खर्ची घालून नर्सेसना शिक्षण देण्याची उत्कृष्ट शाळा तिनें घातली. नंतर १८५८ सालीं 'ब्रिटिश सैन्याचें आरोग्य' या विषयासंबंधानें तिनें एक आठशे पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. यांत तिनें