नमूद केलेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी सरकारनें एक कमिशन नेमलें; अशा रीतीने एका सामान्य स्त्रीनें हातीं घेतलेल्या या प्रश्नाला सरकारी राज्यकारभारांत एका मोठ्या खात्याचे महत्त्व प्राप्त झालें. ही इस्पितळ-सुधारणेची चळवळ व नाइटिंगेलचें नांव हीं सर्व युरोपभर पसरली; आणि नाइटिंगेल ही युरोपांतील स्त्रीजातीचा अलंकार होऊन बसली.
तिची प्रकृति क्रिमियांतच रोडावली होती. तरी खुटुरुटू करीत ही स्त्री वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत जगली! सगळं राष्ट्र तर तिला भजत होतेच; पण खुद्द व्हिक्टोरिया राणीसुद्धां तिची मैत्रीणच झालेली होती. १८०७ सालीं आजपर्यंत कोणाहि स्त्रीला न मिळालेला, 'ऑर्डर ऑफ मेरिट' चा मान एडवर्ड बादशहानें तिला दिला; व लागलीच पुढल्या वर्षी 'फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन' हा मान देऊनहि त्याने तिचा गौरव केला. अशा रीतीनें आपलें सर्व आयुष्य मानव्याच्या सुखासाठीं वेचून आणि त्याच्या कृतज्ञतेचा आनंदाने स्वीकार करून ही 'दीपाबाई' फ्लोरेन्स नाइटिंगेल १९१० साली मरण पावली.
● ● ●