Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दीपाबाई
११
 


 ती एवढ्यावरच थांबली नाहीं. 'आपला पगार तुम्ही दारूंत खर्च करूं नका' असें ती शिपायांना सांगू लागली. त्यांचे शिल्लक पैसे बँकेत ठेवण्याची तिनें व्यवस्था केली, किंवा त्यांचीं जीं बायकामुलें ओढगस्त स्थितींत होतीं, त्यांच्याकडे ती पाठवू लागली. या तिच्या कामगिरीमुळे सगळे रुग्ण लोक तिला देवता समजून भजू लागले. दिवसाच्या कांठीं वीस वीस तास ती काम करीत असे. रात्रीच्या वेळीं सर्व निजानीज झाल्यावरसुद्धां हातांत कंदील धरून ही दुःखितांची परामर्शी स्त्री, चार चार मैल पसरलेल्या खाटांच्या रांगांतून, कोणास ताप आला आहे, कोण कण्हत आहे, कोणास काय हवें, हें पाहत हिंडत असे. हातांत दिवा घेऊन ती येऊ लागली, म्हणजे या दीपाबाईस पाहून शिपायांना अतिशय हर्ष होई; आणि तिची सांवली जरी त्यांच्या अंथरुणावर पडली, तरी त्या सांवलीला हात लावून ते सलाम करीत; आणि म्हणत, "या माउलीने आमच्या दुखण्यांतून आम्हांला वांचविलें; नाहीं तर आम्ही आमच्या जिवाला आणि बायकामुलांना केव्हांच मुकलों असतो. खरोखर ही येथे येण्याच्या आधीं या इस्पितळांत शिव्याशाप आणि अचकटविचकट बोलणें यांशिवाय दुसरें कांहींच ऐकूं येत नसे. पण आतां आम्ही लोक प्रार्थना करतो आणि परमेश्वराचे गुणानुवाद गातों." अशा रात्रीच्या वेळीं सुद्धां एखाद्या शिपायाला आपल्या घरीं पत्र लिहावेंसें वाटलें, तर ती त्याचें पत्रहि लिहून देत असे !
 एकदा असें झालें कीं, आपले काम केवळ इस्पितळापुरतें ठेवावें, हें तिला बरें वाटेना. प्रत्यक्ष रणांगणावर काय चालतें, हें पाहण्याची इच्छा तिला झाली. म्हणून खुद्द क्रिमिया द्वीपकल्पांतच ती गेली. स्कुटारी गांवीं शिपाई लोकांच्या व्यवस्थेची हयगय दिसून आली होती; तशीच तेथेंहि दिसून आली. तिच्या देहस्वभावाप्रमाणें तिनें येथेंहि अतोनात कष्ट केले. त्या द्वीपकल्पांत जेवढीं म्हणून लहान लहान इस्पितळें होतीं, तेवढीं सगळीं तपासून पाहण्याचा तिनें निश्चय केला. जेथें गाडींतून जातां येईल, तेथें गाडींतून जावें, गाडीवाट नाहीं तेथें घोड्यावरून जावें, आणि जेथें घोडेहि जाण्यासारखे नसत, तेथें पायींच जावें, असा क्रम तिनें ठेवला. मुलूख खडकाळ आणि वैराण असल्यामुळे तिला शरीरकष्ट अतिशय झाले. त्यांतच केव्हां बर्फ पडावें किंवा बर्फासारखे गार वारे सुटावे; पण कसलीहि दरद न बाळगतां एकटीनें प्रवास करावा, व शिपायांचे हाल कसे कमी होतील, याची विवंचना मात्र सोडूं नये, असें काम अव्याहत चाललेलें होतें. तीन वेळां ती