Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
कर्तबगार स्त्रिया
 


तिनें आपल्या पैशांतून निराळे पौष्टिक पदार्थ तयार करून ते त्यांना देण्याचा परिपाठ पाडला. मुदपाकखाना, धुवणखाना, स्नानगृहें, इत्यादींवर सक्त नजर ठेवून तिनें जिकडे तिकडे लखलखाट करून टाकला. यामुळे 'इस्पितळ म्हणजे नरकपुरी' हा शिपायांचा समज साफ बदलला; आणि आश्चर्य हें कीं, हयगय, उपासमार, साधनांचा अभाव, इत्यादींमुळे, ती येण्याच्या आधीं शेंकडा पंचेचाळीस रोगी मरत असत, ते तिचें काम सुरू झाल्यावर शेंकडा तीनच मरूं लागले! हें पाहतांच डॉक्टर लोक, अधिकारी, सेनापति या सर्वांचे डोळे खाडकन् उघडले; आणि आपण स्वतः माणसे नसून हैवान आहों, आणि आपण जिला केवळ हिडिसफिडिस करीत होतों, ती उगीच कोणी साधी स्त्री नसून मनुष्यमात्राच्या कल्याणासाठीं स्वर्गांतून आलेली देवांगनाच आहे, असें त्यांस वाटू लागलें!
 तेथील अंमलदारांना जरी तिचें महत्त्व अशा रीतीनें पटू लागलें, तरी हातांतील सत्ता सोडावयास ते यत्किंचितहि कबूल होईनात. पण आपल्या कामाची उपयुक्तता ज्यांना पटावयाची, त्यांस पटून चुकलेली आहे, याची जाणीव फ्लोरेन्सला असल्यामुळे या अधिकाऱ्यांचा विरोध ती केवळ धुडकावून लावू लागली. शिवाय, येथील एकंदर हकीगतीचीं सविस्तर पत्रे तिनें वेळोवेळीं सिडने हर्बर्ट याला लिहिण्याचा प्रघात ठेवला. यांत काय हवें, किती हवें, इत्यादि पाढा ती वाचीत असे; व तिच्या मागणीप्रमाणें सामानसुमानहि भराभर येत असे. अर्थात् तिच्या रुबाबापुढें अधिकारी लोक अगदीं मालवल्यासारखे झाले. कपडे करणें, रोजची देखरेख ठेवणें, सामानसुमान पुरविणें, हवें असेल तें खरेदी करणें, इत्यादि सगळीं खातीं तिनें अगदीं बांधून टाकलीं; आणि त्यांच्या कामाला अशी कांहीं शिस्त लावून दिली कीं, तिच्या त्या पद्धति अजून चालू राहिल्या आहेत. खाणेपिणें, वस्त्रप्रावरण आणि स्वच्छता, इत्यादींची योजना अंमलांत आलेली आहे, हें पाहून आजारी किंवा जखमी शिपायांच्या मनाला कांहीं विरंगुळा प्राप्त व्हावा, म्हणून तिनें बारीक बारीक वाचनालयें सुरू केली. स्वाभाविकपणेंच घाणेरड्या चकाट्या पिटण्याऐवजीं चांगला मजकूर वाचावयास किंवा ऐकावयास सांपडत आहे, असें दिसतांच त्या लोकांना फारच आनंद झाला. बापडे लष्करी अधिकारी मात्र जोराने तक्रार करूं कीं, ही बाई या शिपायांना बिघडविणार! शिपायांचा आणि वाचनाचा काय संबंध!