Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दीपाबाई
 


असें कांहींच नव्हतें! पण तेव्हां ही गोष्टहि, आणि इंग्लंडांतहि, नवीनच होती. स्वच्छता ठेवावयाची, तर हवा खेळती ठेवावयास हवी. मात्र तेव्हां पद्धत अशी असे कीं, दारें दपटून आंत रोग्याला ठेवावें! खोलीला खिडक्या असल्या, तर त्या बंदच ठेवावयास हव्या असें तत्त्व होतें! येथपासून फ्लोरेन्सला वादावादी करावी लागली. शेवटीं खिडक्या उघड्या ठेवाव्या असें ठरलें! यावरून कल्पना येईल कीं, केवढ्या क्षुद्र सुधारणेसाठींसुद्धां तिला झगडावें लागलें. पण तिच्या या नवीन उपायांचा व धोरणाचा उत्तम उपयोग होत आहे, असें ताबडतोब दिसूं लागलें. तिची कर्तबगारी पाहून किंग्ज कॉलेज हॉस्पिटलवर तिची नेमणूक करण्यांत आली. क्लोरोफॉर्मचा उपयोग नुकताच सुरू झाला होता; आणि रोग्याची विशेष प्रकारची बडदास्त ठेवावी, ही कल्पनाहि रूढ होऊं लागली होती. त्यामुळे रोग्यांना सुख लागूं लागलें होतें. या इस्पितळाचें काम तिच्या हातून मार्गास लागत आहे, तोंच एक अकल्पित प्रकार घडून आला.
 इ. स. १८५४ सालीं क्रिमियन युद्ध सुरू झालें. काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्याकर क्रिमिया नांवाचें द्वीपकल्प आहे. तेथें इंग्रज व रशियन्स यांचें युद्ध जुंपलें. युद्धांत जखमी झालेल्यांना किंवा तळावर आजारी पडलेल्यांना जहाजांत घालून त्या समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर आणीत; व बास्फोरस सामुद्रधुनीच्या पूर्व किनाऱ्यावर जे स्कुटारी म्हणून शहर आहे, तेथें त्यांना औषधपाणी करीत. हे शहर तुर्कांचें होतें. त्यांनीं इस्पितळांसाठी मोठमोठे वाडे खाली करून दिले होते. पण हीं घरें जुनीं व घाणेरडीं असत, व्यथितांच्या मानानें डॉक्टर अगदी थोडे पडत. शुश्रूषिका किंवा परिचारिका अशा कोणी नव्हत्याच. इतकेंच काय, पण जखमा बांधावयास पुरेशा पट्ट्यासुद्धां मिळत नसत. या गैरव्यवस्थेचा दोष सेनापतीकडेच जातो. पण एकंदरीत सगळी व्यवस्था जितक्यास तितकीच असल्यामुळे कोणी कोणास बोल लावावा, असें होतें. या हयगयीचा परिणाम असा झाला कीं, प्रत्यक्ष लढाईत रशियनांच्या तलवारीनें जितके शिपाई मरत, त्यांपेक्षां शुश्रूषा नसल्यामुळे जास्त जखमी व आजारी हे मरत.
 वर्तमानपत्रांनी जेव्हां ही बातमी इंग्लंडांत फोडली, तेव्हां एकच हाहाःकार झाला; व आमच्या शिपायांना आपण असेच मरू देणार का, असें सरकारास जो तो विचारू लागला. फ्लोरेन्सचा मित्र सिडने हर्बर्ट हा या वेळीं युद्धमंत्री झालेला होता. त्यानें फ्लोरेन्स हिला ताबडतोब लिहिलें कीं, आतां राष्ट्राला तुमच्यासारख्या