Jump to content

पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कर्तबगार स्त्रिया
 


हुशार व उदार सेविकेची आवश्यकता आहे. तिने लागलीच होकार दिला. सरकारी हुकूमहि तिच्या हातांत लगोलग आला; आणि आपल्या पसंतीच्या अडतीस परिचारिका घेऊन फ्लोरेन्स ही स्कुटारीस जाण्याच्या तयारीस लागली!
 फ्लोरेन्स नाइटिंगेल ही उच्चकुलीन सुस्वरूप कुमारी आपला मोठेपणाचा अभिमान सोडून, शिपायांच्या आडदांडपणाची भीति न बाळगतां, केवळ व्यथितांच्या शुश्रूषेसाठी द्वीपांतरास जावयास निघाली आहे, ही वार्ता देशांत पसरतांच चारहि दिशांत तिची वाहवा होऊ लागली. उदार धनिकांनीहि योग्य ती सर्व मदत तिला केली. पण ख्रिस्ती धर्माच्या अमुक एका पंथाची ती आहे, आणि त्याच पंथाची सगळी माणसें तिने आपल्या तुकडीत गोळा केली आहेत, असा आरोप तिच्यावर बऱ्याच जणांनी केला. लष्करी अधिकारी तर म्हणूं लागले की, हे पुरुषमाणसांचें काम आहे, यांत असल्या बायकामाणसांनी विनाकारण कां पडावें? शेवटी व्हिक्टोरिया राणीपर्यंत हे आरोप आणि ह्या कुरबुरी जाऊन पोचल्या. तिला या कुत्सित लोकांचा अतिशय राग आला; आणि त्या सर्वांना झिडकारून लावून तिने फ्लोरेन्स हिला प्रोत्साहनपर आशीर्वाद दिला आणि ह्या तिच्या उदार कृत्यांत तिला यश चिंतिले. व्हिक्टोरियाच्या या साह्यामुळे फ्लोरेन्स हिचा मार्ग पुष्कळच सुकर झाला; व विशेष निर्भयपणाने ती आपल्या कामास लागली.
 जखमी व आजारी यांना उपयोगी पडणाऱ्या सामानाचे गठ्ठे आपल्याच बरोबर न्यावे असे तिने ठरविले. माहितगार लोक म्हणाले, 'कांही जरूरी नाही. स्कुटारी येथे सर्व काही आहे.' पण त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तिने हे गठ्ठे आपल्या- बरोबरच नेले; आणि स्कुटारीस पोहोचल्यावर तिला दिसून आले की, सामान आणले हे फार बरे झाले. तेथील इस्पितळे पाहिल्यावर तिला अतिशय वाईट वाटले. घराच्या खालूनच मोऱ्या गेलेल्या होत्या; आणि इस्पितळांतील सगळी हवा त्या घाणीने भरून गेलेली असे. भुईला इतके पोपडे आलेले, आणि भिंतीला भोकसे पडलेले होते, की उंदराघुशींच्या फौजाच्या फौजा रात्रंदिवस तेथें हिंडत असत. आजाऱ्यांच्या खाटा अशा खेटून घातल्या होत्या की, मधून सरकावयास वाटसुद्धां राहिली नव्हती. खिडक्याबिडक्यांविषयीं तर बोलावयास नको. शुश्रूषेचें सामान कांहींच नव्हतें. बशा, तसराळी, रुमाल, साबण, चमचे, पळ्या यांतलें काहीहि नव्हते. रोग्याला इकडून तिकडे न्यावयाचे, म्हणजे दोघां-चौघांनी त्याला उचलून दामटून न्यावयाचे इतकेंच; सरकगाड्या नव्हत्या, मोडलेली हाडे बांधावयास न्यावे,