पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बूज येथे शेवटपर्यंत राखली जात नाही. त्यामुळे कर्णाची व्यक्तिरेखा येथे जिवंत होत नाही, आणि सामाजिक चिंतन येथे अनुभवाचे घटक बनून व्यक्त होत नाहीत, येथे महाभारतातील कथेचा समाजप्रबोधनाच्या प्रेरणेतून वापर केला आहे. 'मृत्युंजय', 'राधेय', 'कौंतेय' या साहित्यकृतीत कर्णाच्या व्यक्तित्त्वाच्या अंतरंगाला जसा स्पर्श होतो तसा येथे होत नाही. या नाटकातील घटनांची मांडणी कलाविसंगत झाली आहे. या नाटकाच्या पहिल्या अंकात कृष्णकर्ण भेट होते आणि त्यात कर्णाच्या मृत्यू निश्चित होतो. अशुभ भाकीत कळूनही कर्ण यत्किंचितही हलत नाही. उलट कृष्णच दिङ्मूढ होतो. महाभारतात कृष्ण सगळ्यांनाच मार्गदर्शक, व्यवहारज्ञ वाटतो पण येथे कर्ण श्रीकृष्णाला महायुद्धांच चैतन्य कायम राखण्यासाठी 'तू दिङ्मूढ होऊ नकोस' असे विनवितो. कर्णाच्या पराक्रमी वृत्तीला येथे महत्त्व दिले आहे. 'क्षत्रियांचे काय आणि शिपाईगड्याचे काय धारातीर्थातच जीवनाचे सोने होते.' कर्णाच्या या उद्गारातून नाटककाराने त्याचे उदात्त चित्र रेखाटण्याचा प्रयत्न येथे केला आहे, त्या अनुरोधानेच कथानकाची उभारणी केलेली आहे हे लक्षात येते. मातृद्रोह, पितृद्रोह, राजद्रोह यांपैकी कोणत्याही प्रकारचा द्रोह करायला हा उदात्त कर्ण तयार नाही. 'कुंतीच्या बालबुद्धीने तुझा त्याग न होता तर कौरव-पांडवांच्या इतिहासाला काही निराळंच वळण लागून या भरत - खंडाच्या भाग्यानं हिमालयाला ठेंगणं करता आलं असतं.' (पृ. ३०) या श्रीकृष्णाच्या उद्गारातून कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी पूर्णपणे व्यक्त झाली आहे. कृष्ण - कर्ण भेटीत कृष्णाला कर्णाचे कणखर व्यक्तित्त्व प्रत्ययाला येते. 'अधर्म - युद्धाने मिळणारा जय पांडवांनाच लखलाभ असो.' असे कर्णाचे उद्गार आहेत. कर्णाने धर्म-अधर्माची चर्चा करावी इतपत त्याची प्रतिमा महाभारतात उजळ नाही. त्याला तो अधिकारही पोहचत नाही. पण ठाकरे यांची सारी सहानुभूती कर्णालाच आहे. म्हणूनच तो कृष्णाला असे स्पष्ट बजावू शकतो. महाभारतात कृष्णाने मोठ्या सूचकतेने अखेरचे अस्त्र म्हणून कर्णाला सुंदर द्रौपदीचे स्मरण करून दिले होते. या नाटकात मोठ्या अनुदारपणाने या गोष्टीचा उल्लेख आहे. त्यातून पांडवांविषयीचा तिरस्कार व्यक्त होतो. " उपेक्षितांची वेदना :- वासुदेव भटजींच्या रूपातील कृष्णाशी जेव्हा कर्णाचा संवाद होतो. त्यावेळचे कर्णाचे उद्गार म्हणजे उपेक्षितांचे अंतरंग ढवळून काढणारे आहेत. कर्ण म्हणतो 'आत्मविश्वासाच्या मळ्यातच गर्वाचा दवणा दरवळतो. मी आपल्या गर्वाची फेक गगनाला भिडेइतकी उंच भिरकावीन, तेव्हा माझ्या गरीब नू कष्टाळू जात भाईंना थोडासा धीर येऊन, ते आपल्या माणुसकीच्या हक्कासाठी धडपडू लागतील. आजपर्यंत गर्वाचा सारा खजिना तुम्ही वरिष्ठांनी वापरला आता थोडा तरी - कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ३९