पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ मूळ कथेनुसार मी प्राथमिक प्रयत्न केला आहे. ' नाटककाराने प्रस्तावनेत आपला हा प्राथमिक प्रयत्न असल्याचे मान्य केले आहे. महारथी कर्णाच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर बालहत्येचा प्रश्न आणि सामाजिक सुधारकांच्या मार्गातील अडथळे यांचा परामर्श घेणारे हे नाटक आहे हेही स्पष्ट केले आहे. के. सी. ठाकरेंनी महाभारतातील कर्णाच्या कथानकाची निवड 'अपत्यहत्या' आणि दलितांच्या आत्मोन्नतीचा प्रश्न या दोन समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी केली आहे. या दोन प्रश्नांच्या अनुषंगाने महाभारतातील कर्णकथेचा विचार केला तर या दोन्हीही समस्यांवर एकाच वेळी प्रकाशझोत टाकण्यासाठी ही कथा वापरणे संयुक्तिक वाटत नाही. 'कर्ण' दलितांचा प्रतिनिधी मानणे हेच मुळी वादग्रस्त आहे. कारण दुर्योधनासारखा मित्र, अंगराज्य, मानसन्मान लाभलेल्या कर्णाला दलित मानता येईल काय ? सेनापती, महारथी म्हणून त्याचा गौरव वेळोवेळी कौरवराज्यात झाला आहे. पण 'सूतपुत्र' म्हणून त्याची पांडवपक्षीयांकडून झालेली अवहेलना लक्षात घेता असे सामान्यतः मानले जाते. ठाकरे यांनी अपत्यहत्त्येच्या पापाविषयी स्त्रियांच्या बाबतीत वैचारिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर कुंतीला 'कर्ण' या आपल्या पहिल्याच अपत्याचा त्याग करावा लागला याची जाणीव तीव्रतेने नाटककाराला झाली आहे. ठाकरे यांची ही क्रांतीची भाषा लक्षात घेता या नाटकाला खाडिलकरांच्या नाटकांसारखे जे एक गंभीर विचार नाट्याचे स्वरूप यायला हवे होते ते येत नाही. अशा प्रभावी विचारनाट्याचा प्रत्यय नाट्याचार्य खाडिलकरांच्या कीचकवध, विद्याहरण इत्यादी नाटकांमधून येतो. महाभारताच्या कथानकाचा सारा तोल सांभाळून खाडिलकरांनी आपले कलात्मक विचारनाट्य फुलविले आहे. उदात्त कर्ण चित्रण :- 31 द्रोणवधानंतर या नाटकाचे कथानक सुरू होते. अश्वत्थमा या घटनेने कमालीचा अस्वस्थ होऊन दुर्योधनासमक्ष कर्णाला दूषण देऊ लागतो. तेव्हा निष्ठावंत कर्ण उद्गारतो, 'भारतीय महायुद्धाचे मुकाबले, मोहाच्या किंचित् झळींनं वितळणाऱ्या सात्त्विक ब्राम्हणी पिंडासाठी खासच नाहीत.' ( अंक १, पृ. ६) क्षत्रीय व ब्राम्हण यातील संघर्ष स्वकालीन समाजव्यवस्थेच्या वैगुण्यातून नाटककाराला येथे जाणवलेला आहे. नाटक महाभारतकालीन कथेवर आधारित आहे. पण नाटककाराची भूमिका स्वतःच्या कालांतील समस्या सूचित करण्याची आहे हे स्पष्ट होते. येथे कर्णाच्या क्षात्रतेजाला उजळा देण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. 'कर्णा'ला एक माणूस म्हणून त्याचे जिवंत चित्रण करून बेमालूमपणे स्वतःला अभिप्रेत असलेले विचार व्यक्त करण्यात नाटककार असमर्थ ठरला आहे. कलात्मक पातळीची ३८ || कर्ण आणि मराठी प्रतिभा