पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर्णाचा पोरकटपणा दिसतो. या सगळ्या कर्णाच्या जीवनाला लांछन आणणाऱ्या गोष्टी आहेत. ही कर्ण जीवनाची नवी संगती सांगितल्यानंतर डॉ. वाळिंबे कर्णाच्या जीवनाची जमेची बाजूही सांगतात. निर्वाणीच्या वेळी कर्ण वासवीशक्ती योजण्याचे ठरवितो, कुंतीला मुलांच्या संरक्षणाचे वचन देतो. भीष्माची क्षमा मागतो आणि दुर्योधनावरील आपली अलौकिक निष्ठा अभंग ठेवतो. इत्यादी गोष्टींचा या संदर्भात उल्लेख ते करतात. म. रं. शिरवाडकर यांनाही अर्जुनाच्या तुलनेने कर्ण सामान्य वाटतो. असा प्रेमा कंटकांप्रमाणेच, अर्जुनाशी तुलना करून त्यांनी निष्कर्ष काढला आहे. कर्णाच्या भोवतालचे अद्भुतरम्येतेचे वलय वगळून ते विचार करतात, त्यामुळे त्यांना कर्णाचे व्यक्तित्व विलोभनीय वाटते. कर्णाचे कवचकुंडलदान आपल्याला बेचैन करते आणि कर्णाला त्याच्या दुर्दैवाने मिळालेले शाप त्याच्याविषयीची अनुकम्पा निर्माण करण्यास कारणीभूत होतात, अशी कर्णाविषयी आपली मर्यादित सहानुभूती त्यांनी व्यक्त केली आहे. प्रेमा कंटकही 'कर्णार्जुन' तुलना करून एक वेगळाच कर्ण उभा करतात. गुरुशिष्य सामंजस्य असणे आवश्यक असते, ते परशुराम द्रोण व कर्ण या गुरुशिष्यांत नसल्यामुळे कर्णाची विद्या फलद्रूप होत नाही, हा एक नवा विचार त्यांनी मांडला आहे. कर्ण शुद्ध आणि मोकळ्या मनाचा नव्हता, तो पराक्रमी असला तरी व्रती व संयमी नव्हता. कर्णाच्या महत्त्वाच्या उणिवांकडे त्यांनी नव्याने आपले लक्ष वेधले आहे. प्रेमा कंटक यांनी नैतिक मूल्यातून आणि स्वतःमध्ये रूजलेल्या गांधीवादी विचारसरणीतून कर्णजीवनावलोकन केले आहे. दानाची प्रतिष्ठा मोठी मानली पण दानाच्या परिणामाचा विचार कर्णाने केलेला नाही. कर्णाने ब्राम्हण वेषातील इंद्राला दान का दिले, याचा 'ब्राम्हणांच्या शापांमुळे, ब्राम्हणाची धास्ती कणनि घेतली होती' असा एक नवा अन्वयार्थ लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कर्णाच्या स्वामिनिष्ठेची भलावण करून त्यात कर्णाचा इमानीपणा व्यक्त झाला आहे, असे म्हणून पुढे त्यांनी या सद्गुणाचेही मार्मिक खंडन केले आहे. कर्ण दुर्योधनाच्या दुष्कृत्यात सहभागी होतो, तो कुठेही दुर्योधनाच्या दुष्कृत्यांचा निषेध करीत नाही, तसे केले असते तर दुर्योधनाला कर्ण मित्र म्हणून चाललाच नसता. हा त्यांचा एक नवा शोध पटण्याजोगा आहे. कर्ण सेनापती म्हणून फक्त दोन दिवसच टिकू शकला,' हाही त्यांचा नवा मुद्दा आहे. कर्णाची संस्कारविहीनताच त्याच्या अधःपाताला कारणीभूत झाली, असे प्रेमा कंटकांच्या सुसंस्कारावर प्रेम करणाऱ्या मनाला जाणवले आहे. अशी ही विविध प्रतिपादने, मतमतांतरे पाहिली म्हणजे महाभारतनिष्ठांच्याही महाभारत - विवेचनात वेगळेपणा आहे हे लक्षात येते. याला कारण महाभारताच्या स्वरूपातच सापडते. महाभारताचा विचार एक पुराणकथा म्हणून केला पाहिजे. २८ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा