पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर्णचित्रणात त्याच्या दोषांनाही गुणस्वरूप प्राप्त झाले आहे असे वाटते. त्यामुळे ललित लेखकांवर ते अत्यंत आक्रमक व विघातक शब्दातही टीका करतात. या ललित साहित्याची प्रकृती आणि पुराणकथांचे स्वरूप लक्षात घेतले तर त्यांचे सगळे हल्ले परतवून लावता येण्याजोगे आहेत. महाभारताशी मिळतीजुळती भूमिका घेणाऱ्या लेखकांच्या गटात प्रामुख्याने बाळशास्त्री हरदास, गो. नी. दांडेकर, शं. के. पेंडसे, म.रं. शिरवाडकर, प्रेमा कंटक, डॉ. रा. शं. वाळिंबे, अनंतराव आठवले इत्यादींचा समावेश येथे केला आहे. या प्रत्येकाने रेखाटलेली कर्णाची चरित्रचित्रे पाहिली असता त्यांतही फरक दिसतो. भिन्न प्रतिपादने आढळतात. काही नवीन मुद्दे उपस्थित केलेले दिसून येतात. प्रत्येकाने स्वतःच्या जीवनदृष्टीतून कर्णाच्या जीवनाची पाहणी करून वेगवेगळ्या प्रसंगांना, कर्णाच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंना, कमीअधिक, प्रधानगौण भावाने स्थान दिले आहे. आपल्यापरीने कमीअधिक व भिन्नभिन्न प्रकाशझोत टाकले आहेत. त्यात भावरेखांची आणि रंगांचीही विविधता दिसून येते. महाभारताशी जुळती भूमिका घेणाऱ्या या लेखकांच्यामध्येही जेंव्हा वेगवेगळे निष्कर्ष आढळतात, एकाच घटनेची वा प्रसंगाची वेगवेगळी उकल आढळते, अनेक नवे मुद्दे नव्याने उपस्थित केले जातात व विशेषतः कर्णाचे प्रत्येकाचे स्वतंत्र विवेचन आहे हे लक्षात येते, तेव्हा महाभारत प्रमाण मानून त्याला धरून लिहिणाऱ्यांची जर अशी स्थिती होत असेल तर मग ललित साहित्यिकांना दोष देण्यात फारसा अर्थ दिसत नाही. कलावंताला तर स्वातंत्र्य आहेच. त्याच्या कलात्मक अनुभवात जे विश्व सामावते ते आणि तेवढेच विश्व त्याचे असते. साहित्यिकांना तर पुराणकथांनी ( इतिहासापेक्षाही ) कितीतरी अधिक प्रमाणात स्वातंत्र्य घेण्याची सनद दिली आहे. कर्णाची विविध आकलने :- महाभारतातील कर्णाचे प्रत्येकाचे आकलन येथे लक्षात घेतल्यास, प्रत्येकाचे कर्णविषयक विवेचन स्वतंत्र व आगळे आहे असे लक्षात येते. बाळशास्त्री हरदास गुणदोषांसहित महाभारतीय कर्णाचे दर्शन घडवितात व त्यातून महाभारतकाराला अभिप्रेत असलेल्या तात्त्विक चिंतनाचे संसूचन करतात. तर गो. नी. दांडेकर दुर्वासाचा तामसी मानसपुत्र म्हणून कर्णाचा विचार करतात. आदित्य, पांडू, अधिरथ, दुर्वास, कुंती आणि राधा या सगळ्यांचाच तो पुत्र आहे, हेही गो. नी. दांडेकरांनी नव्याने चित्रित केले आहे. दांडेकर कर्णाचे कणखर चित्र रेखाटतात पण त्याबरोबरच भारतीय युद्धातील त्याची द्विधा मनःस्थिती विशेष प्रभावीपणे उलगडून दाखवितात. कुंतीच्या मन:स्थितीचे विस्तृत तपशीलवार व २६ || कर्ण आणि मराठी प्रतिभा