पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'कलाकृती व्यक्तिमत्वाच्या आधारानेच जन्मते' या न्यायाने गो. नी. दांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श 'कर्णायन' मधील कर्णकथेला, त्याच्या जीवनातील प्रसंगांना झाला आहे. कर्णायनमधील कर्ण विद्यार्जनासाठी जातांना पित्याला सांगतो .... मी मर्यादा सोडणार नाही तात पण मी अपमान सहन करणार नाही ! ११ येथे कर्णाच्या मानी स्वभावाची जाणीव होते. अधिरथाकडून कुंतीची कथा ऐकताना भाबडेपणाने ती कर्णाला जणू जन्मांतरीची व्यथा ठाऊक आहे असे दांडेकरांनी केलेले वर्णन संपूर्ण काल्पनिक आहे. कर्णजीवनाची पार्श्वभूमी :- दुर्वासाकडून कुंतीला प्राप्त झालेला वर या प्रसंगावर दांडेकर विशेष भर देतात. अनेक सूक्ष्म बारकाव्यांसह विस्ताराने ते कर्णजीवनाची प्रथम ही पार्श्वभूमी सांगतात. त्यातून नव्याने, दुर्वासाचे उग्र, संतापी, तपः पुनीत, बलवान व्यक्तिचित्र निर्माण करतात. तसेच कुंतिभोज आणि शूरसेन यांच्या स्नेहाच्या संबंधावर नव्याने प्रकाश टाकतात. दुर्वासांचा बालभाव अजून लोपला नाही या कुंतीच्या जाणिवेला पूरक असेच 'धात्री' मोठे सूचक बोलते. 'म्हणजे हे मूल विवाहापूर्वीच झाले आहे तुला. ' (पृ. १२) दुर्वासांच्या हट्टी चित्रणापेक्षा कुंतीच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाकडे हे चित्र विलक्षण गतीने वाचकांना घेऊन जाते. सूर्य आणि कुंती यांच्या संवादात गो. नी. दांडेकर यांनी योजिलेले एक वाक्यही असेच मोठे सूचक आहे. कुंती मोहाला का बळी पडली याचा एक वेगळा उलगडा करणारे आहे. 'वृक्षवल्ली मोठचा झाल्या की फुलाफळांनी, बहरून येणारच' (पृ. २१) पण घडलेल्या घटनेने कुंतीची व्यथा अधिकच तीव्र बनते सर्व शरीर जाळीत असलेले हे अमृत माझ्या उदरी कां शिरले ?' (पृ. २७) कुमारी आणि माता या पेचात 'टाकवतही नाही आणि धरवतही नाही' अशी कुंती बिकट परिस्थितीत सापडली आहे. कुंती, दुर्वास या कर्णाच्या जन्मापूर्वी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मनावर दांडेकरांनी आपले लक्ष विशेष केंद्रित केलेले येथे दिसते. कुंतीचे चित्र त्यांनी मन:पूर्वक रेखाटले आहे. अर्जुन आणि कर्ण यांच्या बालपणच्या पहिल्या भेटीपासूनच दांडेकर वैरभाव चित्रित करतात. त्यात कर्णाला सावध दाखविण्यात त्यांचे स्वतंत्र व्यक्तिचित्रण - कौशल्य जाणवते. 'आजपासून कर्ण तुझा अनुगत स्नेही झाला आहे' कर्णाने हा एका साध्या क्षुल्लक प्रसंगाच्या निमित्ताने दुर्योधनासाठी घेतलेला निर्णय पटत नाही. कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ १३