पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समरप्रसंग, हीनकुलीन जन्म म्हणून अधिक्षेप, दुर्योधनाची मैत्री, ब्रम्हास्त्र - प्राप्तीसाठी परशुरामांची सेवा, असत्याने मिळवलेल्या विद्येच्या विफलतेचा शाप, द्रौपदीची कामना, तिने केलेला कर्णाचा मानभंग, द्वैतवनातील प्रसंग, उत्तरगोग्रहण प्रसंग, कृष्णशिष्टाईच्या अखेरीस कळलेले जन्मरहस्य, कर्णकुंतीभेट व अखेरचे युद्ध इत्यादी कर्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे मोठ्या समरसतेने रेखाटली आहेत. गो. नी. दांडेकरांनी कौमार्यावस्थेत पुत्रप्राप्ती होतांना झालेली कुंतीची व्याकुळ मनःस्थिती आणि बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा पुत्रभेटीतील तिची अपराधी मन:स्थिती यावर आपल्या चित्रणात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महत्त्वाकांक्षी माणसाच्या पदरी आयुष्यात दुर्दैवाने नेमके वैफल्य आल्यावर त्याच्या मनात जो संघर्ष निर्माण होतो, त्याचे अत्युत्कट चित्र आपल्या भावोत्कट व करुण रसानुकूल अशा कर्ण कहाणीत दांडेकरांनी रेखाटले आहे. 'कर्णाच्या जीवनातील कारुण्य व भव्यता मान्य करूनही असे विचारावेसे वाटते की द्रौपदीवस्त्रहरणाचा आदेश देणाऱ्या, केवळ अपमानाची जपणूक करून सूडाच्या प्रेरणेने जीवन जगणाऱ्या, पांडवाचा सत्पक्ष आहे, हे मान्य असूनही असत्पक्षाचे नेतृत्त्व करणाऱ्या कर्णकथेला 'श्री कर्णायन' असे गौरवून रामकथेच्या पंक्तीत दांडेकर बसवू पाहतात हे कितपत योग्य आहे?' असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याचे उत्तर एवढेच की ही कर्णाची शोककथा आहे. तिला कलात्मक रूप देण्याचा गो. नी. दांडेकरांनी आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे. हेच त्यांच्या कर्णाचे वैशिष्ट्य म्हणून लक्षात घेण्याजोगे आहे.. गुणदोषांसह कर्णाचे यथार्थ चित्र रेखाटण्याचा गो. नी. दांडेकरांचा प्रयत्न 'कर्णायन' मध्ये आढळतो. 'श्रीकर्णायन' मधील कर्ण हा महाभारतातील कर्णाचेच अधिक जिवंत व रसरशीत चित्र रेखाटण्याचा एक प्रयत्न आहे. कर्णाच्या जीवनातील ज्ञात समरप्रसंगांना उठाव देण्याच्या प्रयत्नात कर्णाच्या व्यक्तिगत भावजीवनाकडे ( कादंबरीकारांप्रमाणे) दांडेकरांनी विशेष लक्ष पुरविले नाही. मात्र कर्णाच्या जन्माच्या पूर्वीची हकिकत जणू काही तीच कर्णाच्या जीवनाला कारणीभूत असल्याने त्यांनी अत्यंत सविस्तर व तपशीलवार चित्रित केली आहे. गो. नी. दांडेकरांना कर्णाच्या जीवनावर या परिस्थितीचा प्रभाव शेवटपर्यंत उमटलेला नव्याने जाणवला आहे. त्याची द्विधा मनःस्थिती त्यांनी नव्याने दाखविली आहे. 'दांडेकरांनी कर्णाच्या स्वभावाची मीमांसा दुर्वासाच्या संदर्भात केली आहे. त्यांची ही कर्णाच्या तामसीपणाचे विवरण करणारी उपपत्ती सर्वमान्य होईल असे वाटत नाही. ० हे. प्रा. पाटील यांचे मत ग्राह्य आहे. पण दांडेकरांनी कर्णाविषयीची आपली जाणीव आणि भूमिका या निमित्ताने व्यक्त केली आहे. गो. नी. दांडेकरांनी 'कर्णायन' मध्ये महाभारतातील ज्ञात कर्णकथेला अधिक रंगतदार स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा