पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाव मिळेल अशा तऱ्हेने त्यांनी कर्णाच्या व्यक्तिरेखेवर स्वतःचे भाष्य केले आहे. कर्णाला सूतपुत्र म्हणून जे उपेक्षित जिणे वाट्याला आले त्यामुळेच त्याच्या स्वभावात ताठरपणा आला, न्यूनगंडाने पछाडलेला असल्यामुळे त्याचा ठिकाणी आत्मकेंद्रित अहंभाव निर्माण झाला. अर्जुन, द्रौपदी, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य या सर्वांशी त्याचे या ना त्या कारणाने वितुष्ट आले आणि या सगळ्यांच्या विरोधात तो उभा राहिला. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कर्णाच्या दोषांचे दिग्दर्शन आणि स्पष्टीकरण करण्याचा शं. के. पेंडसे यांचा प्रयत्न आहे. बुद्धिमान, पराक्रमी, उदार, 'महापुरूष' म्हणून कर्णाचा गौरव करून केवळ दुर्योधनाच्या सहवासाने या महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व अध:पतित झाले असे त्यांनी सुचविले आहे. 'न्यूनगंडामुळे विवेकशून्य झालेला अध:पतित एक महापुरूष' या शब्दात त्यांनी कर्णाला टिपले आहे. कौरवांचा एक मोठा आधार होण्याचे भाग्य लाभूनही आपल्या जन्माने आपण हीन लेखले जात आहोत या भावनेने कर्ण नेहमीच असमाधानी व असंतुष्ट राहिला. प्रतिष्ठा लाभण्यांच्या संबंधात आपल्यावर फार अन्याय झाला आहे, हे कर्णाच्या जीवनाचे शल्य जाणून घेण्याचा प्रयत्न या नव्या अन्वयार्थातून पेंडसे यांनी केला आहे. पेंडसे यांची भूमिका ललित साहित्यिकाची नसली तरी परंपरेला ज्ञात असलेला महाभारतीय कर्ण अगदी नव्या तऱ्हेने त्याच्या अंतरंगाचा आणि परिस्थितीचा वेध घेऊन त्यांनी चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात पेंडसे यांच्या कर्णाच्या व्यक्तिचित्रणाला संपूर्णपणे आगळे, स्वत:चे असे रूप लाभले आहे. पांडवांचा आणि विशेषत: अर्जुनाचा द्वेष करणे, नाश करणे हेच कर्णाच्या जीवनाचे ध्येय बनले. द्रौपदीने स्वंयवरप्रसंगी केलेल्या अपमानाचे द्यूतप्रसंगी त्याने पांडव, द्रौपदीची मानहानी करून अधःपाताची सीमा गाठली. दुर्योधनाने कर्णाच्या बळावरच पांडवांशी वैर पत्करले. कारण 'कथमादित्यसदृशं मृगी व्याघ्रं जानिष्यति ॥' (आदि. १३७ -१० ) ( वाघाचा जन्म हरिणीच्या पोटी होत नसतो.) हे दुर्योधनाने अचूकपणे जाणले होते. पुढे कर्णाला जन्मरहस्य कळूनही त्याची तगमग आणि न्यूनगंड आणखी वाढला. पराक्रमी कर्ण उपेक्षिला गेला. अशी ही पेंडशांनी चित्रित केलेली कर्णाची व्यक्तिरेखा आहे. 'एक अध:पतित महापुरूष' म्हणून कर्ण त्यांना जाणवला आहे. महाभारतातील कर्णाचे चित्र रेखाटताना त्यात स्वतःचे रंग मिसळून कर्णाचे चित्र येथे अवतरले आहे. पेंडसे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून कर्णाकडे पाहिल्यामुळे त्यांनी केलेले कर्णाचे मनोविश्लेषण वास्तवाच्या जवळ पोहचते. कर्णाच्या जीवनातील अद्भुतरम्यतेपेक्षा मानवी पातळीवरून त्याचे चित्रण केले आहे. स्वतःच्या दृष्टिकोनातून ते कर्णाच्या वागण्यामागील, कृतिउक्तीमागील कार्यकारणभाव १० ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा