पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इत्यादी वैचारिक स्वरूपाच्या लेखनाचा व साहित्यकृतींचा यात सामावेश होतो. प्रस्तुत ग्रंथात केवळ महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्याचाच अभ्यास अभिप्रेत आहे पण डॉ. वाळिंबे, अनंतराव आठवले, दाजी पणशीकर इत्यादी लेखकांच्या लेखनाचाही येथे आवश्यकतेनुसार विचार केला आहे. कारण त्यांच्या या लेखनाचे स्वरूप प्रतिक्रियात्मक आहे. 'मराठी ललित साहित्यातील कर्ण' (प्रा. सुशीला पाटील ) 'सूर्यपुत्र' (विजय देशमुख) या दोन पुस्तकांचाही विचार याच ठिकाणी करणे उचित ठरते. कलात्मक निर्मिती, रंजन, उद्बोधन यापैकी कोणतीही प्रेरणा या लेखनाच्या मुळाशी आढळत नाही; तर या लेखनात लेखकांची महाभारतनिष्ठा महत्त्वाची आहे. महाभारत हे एक वस्तुस्थितिदर्शक महाकाव्य आहे. हे गृहीत धरून त्यातील इतिहासाला जपण्याच्या भूमिकेतून या वैचारिक लेखनाचा जन्म झालेला आहे. ललित साहित्य निर्मात्या साहित्यिकांनी कर्णकथा एक पुराणकथा मानली आणि कर्ण ही एक पुराण व्यक्ती मानली. महाभारतातील कर्णाच्या निमित्ताने त्याचे चिंतन अवतरेलेले आहे, पण ही भूमिका महाभारताचे पारंपरिक आकलन करणाऱ्या लेखकांची नाही. अव्वल इंग्रजी कालखंडातील आरंभीचे साहित्य महाभारतातील कर्णाचे जीवनचरित्र मराठीतून वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठीच जन्मलेले दिसते. ' महाभारतनिष्ठ दृष्टिकोन महाभारतातील कर्ण दुर्योधनाला येऊन मिळालेला आहे याची सतत जाणीव ठेवून या कर्णाच्या ठिकाणी आढळणाऱ्या अद्वितीय सद्गुणांबरोबरच त्याच्या अक्षम्य दुर्गुणांचीही नोंद आवर्जून घेणाऱ्या लेखकांचा विचार येथे करावयाचा आहे. कर्णाविषयी पारंपरिक दृष्टिकोण स्वीकारून 'मुळाबरहुकूम' कर्णाचे दर्शन घडविणारे हे साहित्य आहे. आठवले, वाळिंबे, पणशीकर, पाटील इत्यादींचे लेखन यात अंतर्भूत होते. या लेखकांच्या दृष्टीने आजचे मराठी ललित साहित्यिक 'कर्णाची उपेक्षा झाली, तो दुर्दैवी होता. कर्ण नियतीचा बळी ठरला, तो सूतपुत्र होता म्हणून त्याची कड घेतात. कर्णाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात.' वस्तुतः कर्णाची कीव यावी, त्याच्या जीवनकहाणीविषयी कणव निर्माण व्हावी अशी महाभारतातील कर्णाची स्थिती नाही. शिवाय मूळ महाभारताचे वाचन सर्रास होत नसल्यामुळे ललित साहित्यातील या व्यक्तिरेखाच समाजमनात रुजण्याची शक्यता आहे. म्हणून एक सामाजिक वा राष्ट्रीय कार्य मानून हे परंपरावादी लेखक लेखनास प्रवृत्त झाले आहेत. त्यांचा पिंड व दृष्टिकोन ललित लेखकाचा नाही. तर ते महाभारतनिष्ठ लेखक आहेत. महाभारतातील व्यक्तिरेखांना ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या इतके महत्त्व ते देतात त्यामुळे हे लेखक ललित लेखकांवर विकृत चित्रण, पावित्र्यविडंबन इत्यादी दोषारोप करतात. महाभारताकडे एक 'ऐतिहासिक महाकाव्य' म्हणून हे कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ५