पान:करुणादेवी.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडून गेल्याषासूनचा इतिहास तिने सांगितला. हेमा शांतपणे ऐकत होती. मधूनमधून सद्गदित होत होती.

 “ करुणे, आता हे चित्र नको मागू. शिरीषच तुला देते. जिवंत मूर्ती घे. शिरीषने मला हे मागेच का बरे सांगितले नाही ? ही हेमा मत्सरी नाही. ”

 “ हेमा. रागावू नको. शिरीष मनाचा कोमल आहे. आपण दोघो भांडू असे त्याला बाटले असेल. जगात सवतीमत्सर फार वाईट. शिवाय येथून येण्याचीही अडचण. माझ्या शिरीषवर रागावू नका.”

 “ करुणे, किती थोर मनाची तू! किती तुझी श्रद्धा, किती विश्वास, किती प्रेम ! ऊठ. चल. मंगल स्नान कर. सुंदर वस्त्रे नेस. अलंकार घाल. शिरीष घरी येईल, त्याचे तू स्वागत कर. मी लपून राहीन शिरीषची गंमत करू. तो घाबरेल. बिचकेल. पळू लागेल. गंमत करू हा. ऊठ आता.”

 करुणा स्नानगृहात गेली. कढत कढत पाणी तिने घेतले. अंगाला उटणी लावली. केसांना सुगंधी तेल लावले. स्नानोत्तर ती रेशमी वस्त्र नेसली. मोत्यांचे हार धातले. प्रसन्नमुखी जणू देवता ती दिसत होती.

 दोघीजणी बोलत बसल्या. दोघींनी फलाहार केला. करुणेचे हृदय फुलले होते. आनंद उचंबळला होता. मध्येच हेमाच्या हाताचे ती प्रेमाने चुंबन घेई. शिरीषचा रथ आला. बाहेर ललकारी झाली. हेमा लपली. तेथे मंचकावर करुणा बसली होती. पवित्र, प्रेमळ, हसतमुखी करुणा. शिरीष आला. एकदम आत आला. करुणा उभी राहिली. शिरीष चपापला. आपण घर तर चुकलो नाही, असे त्याला वाटले. तो घाबरला.

 “ क्षमा करा हा !” असे म्हणून तो जाऊ लागला.

 “ अपराध्याला क्षमा नाही. अपराध करून सवरून आता पळून कोठे चालला ?”

 करुणेने शिरीषचा हात धरला. तो निसटून जाऊ लागला.

 “ हेमा, हेमा !' त्याने हाका मारल्या.

 “ ओ ” करून पलंगाखालून हेमा बाहेर आली. ती हसत होती.

 “ फजिती, राजाच्या मुख्य प्रधानाची फजिती. शिरीष, पळून काय जातोस ?"

मीलन * ६७