“ हेमा, काही तरी काय बोलतेस ? मनुष्याने पापापासून पळावे, परस्त्रीपासून पळावे.”
“ शिरीष, स्वस्त्रीपासून पळणे म्हणजे कां पुण्य ?”
“ मी तुला कधी सोडले आहे का?”
“ आणि करुणेला ? करुणेची करुणा तुला अद्याप का येत नाही ? तुझ्यासाठी ती भिकारीण बनली, तरी तुला दया येत नाही ? शिरीष बघ, ह्या सुंदर स्त्रीकडे बघ. माझी अनुज्ञा आहे. माझ्या आज्ञेने तिचा मुखचंद्र पाहा. बघ पटते का ओळख ?”
“ करुणा, माझी करुणा !”
शिरीषने करुणेचे पाय धरले. करुणा लाजली.
“ हे काय शिरीष ? माझे पाय दुखत नाहीत हो. तुझेच यात्रेत हिंडून दमले असतील. भिकारणीला भेटायला आज भिकारी होऊन आला होतास वाटते ? शिरीष, बस. माझे सारे श्रम आज सफळ झाले.”
“ शिरीष, करुणेला पूर्वीच रे का नाही आणलेस ? तिच्या संगतीत माझा उद्धार झाला असता.”
“ माझाही !” शिरीष म्हणाला.
“ काही तरी बोलू नका, ” करुणा म्हणाली.
“ शिरीष, आम्ही भांडू असे का तुला वाटले ? अरे, श्रीकृष्णाच्या सोळा सहस्र नारी भांडत नसत. आम्ही दोन का भांडलो असतो ?”
“श्रीकृष्ण सोळा सहस्र नारींना वागवू शकत होता, त्याची थोरवी आम्हा क्षुद्रांना कोठली ? आम्हाला एकीचेही चित्त सांभाळता येत नाही, तेथे दोघींचे कसे व्हायचे ?”
“ शिरीष, असे नको बोलू. आता आनंदी राहा. आता नाही ना उदास राहाणार? करुणे, शिरीष इतक्या वर्षात मोकळेपणाने हसला असेल तर शपथ. ”
“ करुणे, आपल्या विवाहाचा वाढदिवस लवकरच येईल. हेमा, आम्ही आमच्या विवाहाचा वाढदिवस साजरा करीत असू. एका वाढदिवसाच्या दिवशीच राजाचे दूत मला न्यायला आले.”