पान:करुणादेवी.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मी ल न
♣ * * * * * * ♣








 शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, “ ही बघ माझी तसबीर !”

 “ कोठून आणलीस, शिरीष ?” तिने विचारले.

 “ एका भिकारणीची चोरली. पळवून आणली. आज मी चोर झालो"

 “ शिरीष, असे करू नये. "

 “ परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का असे वाऱ्यावर टांगून ठेवायचे ? जणू फाशी दिलेला. आणले मी काढून.”

 “ शिरीष, काही तरी बोलतोस. हे तुझे चित्र पुष्कळ वर्षांपूर्वीचे आहे. तू तुझ्या गावी असशील, तेव्हाचे आहे. तुझ्या घरी होते हे चित्र ?”

 "होते."

 “ तेच असेल हे तुझे. आईबाप मेले, घरात कोणी नसेल. तुझे चित्र कोणी तरी लांबविले. परंतु त्या भिकारणीने त्याला माळ का घातलीं ? हे चित्र कोणाचे आहे हे का तिला माहीत होते ?”

 "मला नाही माहीत "

 “ शिरीष, ही तसबीर माझ्या महालात लावू, मी तिला रोज हार घालीत जाईन. दे."

 अशी पतिपत्नींची बोलणी चालली होती, तो राजाचे बोलावणे आले म्हणून शिरीष निघून गेला. हेमा ती तसबीर मांडीवर घेऊन बसली होती, तो बाहेर ती बाचाबाची झाली. भिकारीण भांडत होती. हेमाने भिकारणीस आत ओढले. करुणेने सर्व हकीगत सांगितली. शिरीष

६६ * करुणा देवी