“ हेमा, मी एकटाच जातो दर्शनास. आज मी साध्या भिकाऱ्याच्या वेषाने बाहेर पडणार आहे. साध्या शिरीषला आईबापांचे आत्मे भेटतील. वैभवात लोळणाच्या अहंकारी शिरीषला भेटणार नाहीत. मला नम्र होऊन आज आईकडे जाऊ दे. बाबांकडे जाऊ दे. तू तुझ्या आईबापांबरोबर यात्रेला जा. मी एकटाच जाईन.”
“ शिरीष, परत ये हो. जाऊ नको हो वैतागून. तू राजाचा मुख्य मंत्री आहेस. हेमाचा प्राण आहेस. येशील ना परत ?”
“ येईन. दरवर्षी मी यात्रेला जातो. गेलो का तुला सोडून ?”
“ परंतु भिकाऱ्यासारखा आजपर्यंत कधी गेला नाहीस. आपण सारी बरोबर जात असू. खरे की नार्हृी ? ”
“ परंतु आज एकटाच जातो. रागावू नकोस.”
शिरीष वेष बदलून हळूच बाहेर पडला. अंधार पडला होता. यात्रेत लाखो दीप लागले होते. जणू आकाशातील अनंत तारे पृथ्वीवर अवतरले. करुणेची आशा संपत आली. नाही का येणार शिरीष ? येईल. रात्रभर लोक येतच राहाणार आणि मोठे लोक रात्रीसच येतील.
शिरीषचे चित्र वाऱ्यावर नाचत होते. करुणेचे चित्त आशानिराशांवर नाचत होते. हजारो दिव्यांच्या ज्योती नाचत होत्या. धडपडणाच्या जीवांप्रमाणे नाचत होत्या.
तो पाहा एक मनुष्य आला. भिकाच्यांच्या बाजूला आला. पै पैसा टाकीत आहे. करुणा भजनात रंगली आहे. डोळे मिटलेले आहेत. कोणते गाणे ती म्हणत होती ? जे गाणे विवाहाच्या वाढदिवशी तिने म्हटले होते तेच. कर्तव्याच्या आनंदाचे गाणे ती म्हणत होती. एकतारी वाजत होती. हृदयाची तार लागली होती. तो मनुष्य तेथे उभा राहिला.
आणि त्याला ते चित्र दिसले ! वाऱ्यावर नाचणारे चित्र. त्या माणसाने गाणे म्हणणाच्या त्या भिकारणीकडे पाहिले. त्या चित्राकडे पाहिले. ते चित्र पटकन् त्याने उचलले, घेतले व तो पुढे चालला.
करुणेने डोळे उघडले, तो चित्र नाही. कोठे गेले चित्र ?कोणी नेले चित्र ? वाऱ्याने का उडाले? अरेरे !