पान:करुणादेवी.djvu/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


सर्वांचे प्रदर्शन. देशातील साऱ्या वस्तू तेथे यावयाच्या. मालाची देवघेव, विचाराची देवघेव. व्यापारी व कीर्तनकार, प्रवचनकार, मल्ल, नाटकमंडळ्या, नकलाकार, पोवाडेवाले सर्वांची तेथे हजेरी असायची.

 सोमेश्वराच्या आसपासचे प्रचंड मैदान गजबजून गेले. दुकानदारांना जागा आखून देण्यात आली. पाले लागली. ह्या बाजूस कापडाची दुकाने, इकडे किराणा माल. मजाच मजा. हलवायांची गर्दी विचारूच नका.

 राजधानीतील लोक यात्रा पाहायला येऊ लागले. मुले मुली येत. वृद्ध येत. श्रीमंत गरीब सारे येत. यात्रेचा मुख्य दिवस जवळ येत चालला. सोमेश्वराच्या आवारात त्या वत्सल प्रेमळ मातापित्यांची समाधी होती. तिचे दर्शन घेण्यासाठी, कृतज्ञता प्रकट करण्यासाठी हजारो नारीनर शेकडो ठिकाणांहून येत होते. रथांतून येत होते. हतीवरून येत होते. उंटांवरून येत होते. कोणाचे मेणे, कोणाच्या पालख्या. सारी वाहने तेथे दिसत होती.

 यात्रेचा मुख्य दिवस आला. करुणेचे हृदय आशेने उचंबळले होते. आज शिरीष येथे आल्याशिवाय राहाणार नाही. हातात एकतारी घेऊन ती बाहेर पडली. आज माझा देव मला भेटणार असे तिला वाटत होते. हृदय का प्रतारणा करील ?

 त्या बाजूला सारे भिकारी होते. जो जो येई, तो पै पैसा टाकायला इकडेही येई. शिरीष इकडे आल्याशिवाय राहाणार नाही, असे करुणेला वाटले. ती त्याच भिकाऱ्यांच्यात एके ठिकाणी भजन करीत बसली.

 आणि तिने काय केले ऐका. तिने ते शिरीषचे चित्र काढले. तिने तेथे एक बांबूची काठी पुरली. त्या काठीला तिने ती तसबीर अडकवली. त्या तसबिरीला तिने सुंदर घवघवीत हार घातला होता.

 “ बाई, कोणाची ही तसबीर ?”

 “एका थोर महात्म्याची.”

 हजारो लोक येत जात होते. समाधीवर फुले वाहून जात होते. आईबापांविषयी कृतज्ञता शिकून जात होते. आईबाप मुलांवर प्रेम करावे, असे शिकून जात होते. मुले आईबापांविषयी कृतज्ञ राहावे, असे शिकून

६२ * करुणा देवी